free-bicycles-distributed-akola: ‘जागर’च्या पुढाकाराने हाेतकरू मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर - अविनाश सावजी

१११ मुलींना सायकलींचे वाटप 


भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला:  बोलणारे अनेक सापडतात मात्र सध्या ऐकणाऱ्यांची कमी आहे. शिक्षक शाळेत विषय शिकवतो. त्याचे आपण शिक्षण घेतो. मात्र मेंटॅार आयुष्य कशाप्रकारे जगायचे याचे शिक्षण देतात. त्यामुळे प्रत्येकाने मेंटॉर निवडायला हवे, असे सांगून  जागर फाऊंडेशनच्या पुढाकाराने १११ मुलींच्या जीवनातील शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. यासोबतच या मुलींनी वाचन करून, अभ्यास करून पुढील आयुष्याचा मार्ग सुकर करावा, असे आवाहन अमरावती येथील प्रयास सेवांकुर संस्थेचे समुपदेशक डाॅ. अविनाश सावजी यांनी २ नोव्हेंबर रोजी येथील प्रमिलाताई ओक सभागृहात केले.



           

शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून शाळेत पायी चालत जाणाऱ्या मुलींचा प्रवास सुखकर व्हावा, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जागर फाउंडेशनकडून रद्दी संकलनातून निधी उभारण्यात आला. या निधीतून १११ मुलींना सायकलींचे माेफत वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचन वाढवायला हवे, तसेच जीवन जगत असताना जेवढे शक्य होईल तेवढी इतरांनाही मदत करावी, असे आवाहन सावजी यांनी केले. 



तुळशीदास खिरोडकर यांनी जागर फाऊंडेशनच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. या ठिकाणाहून आपल्याला एक चांगला विचार घेऊन जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.




कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात कीड्सचे डाॅ. गजानन नारे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डाॅ. जगदिश बुकतरे, सुनील खराेटे, डाॅ. आय. एस. हुसेन, जागर फाऊंडेशनचे संयोजक तुळशीदास खिरोडकर, देशमुख महिला मंडळाच्या उपाध्यक्ष नयना देशमुख, रहिमा हुसेन उपस्थित होत्या.  बहारदार संचालन समीर शिरवळकर यांनी केले. प्रास्तविक सुधीर फुलके यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्कृष्ट वक्ते विकास पल्हाडे यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.


उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार


कार्यक्रमात रद्दी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुळशीदास खिरोडकर, रवींद्र कराड, आर. एफ. सैयद, दीपक सरोदे, काैशिक पाठक, आशिष लायसे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.




टिप्पण्या