balapur-meet-uddhav-thakre: लांडगे विकले गेले, पण वाघ विकला गेला नाही - उध्दव ठाकरे यांचे विधान





बाळापूर सभेतील ठळक मुद्दे



उद्धव उवाच 


*लांडगे विकले गेले, पण बाळापूरचा वाघ विकला गेला नाही. तो फटकारा मारायला परत आला.


*'सोन्याची लंका' समोर दिसत असतानाही नितीन देशमुख माझ्यासोबत राहिले, म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो.


*मी गावातल्या लोकांना सांगतोय, आपल्या हक्काच्या राजधानीकडे चला ! रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे, ती ह्यांच्या घशात घालण्यासाठी मिळवलेली नाही.


*भाजपने शेण खाल्लं तरी आम्ही त्याला हिंदुत्व म्हणायचं ? असे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही.


*मी नव्याने महाराष्ट्र उभारून दाखवेन. नवीन उद्योग महाराष्ट्रात आणेन, महाराष्ट्राचं लूटलेलं वैभव परत उभं करेन.



*'भ्रष्टाचारी तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा' अशा पद्धतीने आजचा भाजप चाललेला आहे.



*भाजपलासुद्धा बाळासाहेबांच्या नावाने मतं मागायला लागतात, ही बाळासाहेबांची पुण्याई आहे.




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बाळापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळापूर येथे गुरुवारी सायंकाळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वाभिमानी जाहिर सभा पार पडली. या सभेला विराट जनसागर लोटला होता.



या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे भाजप सरकारवर जोरदार टीका केली.  'सबकुछ मोदी आणि जमीन अदानी हे अजिबात चालणार नाही. आम्ही चालू देणार नाही.  जीवघेणी महागाई, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मिंधे भाजप सरकार महाराष्ट्राच्या उन्नतीचे प्रकल्प गुजरातला पळवून महाराष्ट्र लाचार करायला निघाले आहे.l, असे सांगून मी नव्याने महाराष्ट्र उभारून दाखवेन. नवीन उद्योग महाराष्ट्रात आणेन, महाराष्ट्राचं लूटलेलं वैभव परत उभं करेन, असे ठाकरे म्हणाले.



लांडगे विकले गेले, पण बाळापूरचा वाघ विकला गेला नाही. तो फटकारा मारायला परत आला. 'सोन्याची लंका' समोर दिसत असतानाही नितीन देशमुख माझ्यासोबत राहिले, म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो, असे गौरवउद्गार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नितीन देशमुख यांच्याबद्द्ल भाषणाच्या सुरवातीस काढले.




‘कटेंगे तो बटेंगे' अशी नवी घोषणा देऊन आता हिंदू मुस्लिमांमध्ये व जाती धर्मांमध्ये तेढ, भांडणे लावायला निघाले आहेत. मात्र भाजपचा अजेंडा 'बटेंगे तो कटेंगे' नाही, तर महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तों को बाटेंगे' असा असल्याचा घणाघात  उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र आम्ही आमचा महाराष्ट्र कधीही लुटू देणार नाही, तुटू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी हजारोंच्या जनसमुदायाने 'उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'महाविकास आघाडीचा विजय असो' अशा गगनभेदी घोषणा दिल्या.




ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी व महाराष्ट्र द्रोही यांच्यातील आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटले आहोत. समोर सर्व महाराष्ट्र द्रोही आहेत. आपलं चांगलं चाललेल सरकार गद्दारी करून पाडलं. जी गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही ती मिंध्यांच्या रक्तात आहे. महाराष्ट्राच्या हक्काचं जे काही आहे. हे ते सर्व ओरबाडून गुजरातला नेत आहेत. मग हे महाराष्ट्र प्रेमी होऊ शकतात का? म्हणूनच मी आता मैदानात उतरलो आहे. मला अभिमान आहे की महाविकास आघाडी एवढी मिळून मिसळून काम करतेय. जे काही करतोय ते महाराष्ट्राच्या हिताचं करतोय. 


    

उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळापासून तुम्ही दिलेल्या साथीमुळे मला तुम्ही कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. तुमच्या साथीमुळे ही जबाबदारी आपण पेलू शकलो. तुम्ही साथ दिली म्हणूनच कोरोना काळात महाराष्ट्र वाचला. त्यामुळे यापुढे केवळ मुख्यमंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे काही सर्वोत्तम करायचे ते ते आपण कुटुंबप्रमुख म्हणून करणार. महाराष्ट्र ही माझी जबाबदारी आहे.



महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही शेतकऱयांची कर्जमाफी करून त्यांच्या डोक्यावरील बोजा उतरवला. मात्र भाजप-शिंद्यांनी गद्दारी करून सरकार पाडले. मी मुख्यमंत्री असतो तर शेतकऱयांना पुन्हा एकदा कर्जमुक्त केले असते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मी करून दाखवले असते. तेही वचन आता वचननाम्यात दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


आता ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी भाषण करण्याची गरज वाटत नाही. कारण निष्ठावंतांना गद्दारी माहिती आहे. त्यामुळेच तुम्हीच सगळे बोलता, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. जनताच बोलत आहे की, 'पन्नास खोके, एकदम ओके'. त्यामुळे गद्दारांना गाढणारच. गद्दारी करून वार केलेली भळभळती जखम घेऊन अडीच वर्षे निवडणुकीची वाट बघत होतो. तो दिवस 20 नोव्हेंबरला आला आहे. त्या दिवशी गद्दारीचा सूड उगवायचा. कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेशी नाहीय तर महाराष्ट्राच्या मातीशी आणि महाराष्ट्राच्या मातेशी आहे, असेही ते म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला किल्ला आजही अभिमानाने उभा आहे. मात्र तुम्ही राजकोटवर भ्रष्टाचार करून अशुभ हातांनी पुतळा उभारल्याने तो पडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवराय आमचे दैवत, स्फूर्तिस्थान आहेत. त्यामुळेच आम्ही प्रत्येक जिह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा राजा. संकटाचा सामना करणारा, महिला-भगिनींचा आणि गरीबांच्या भाजीच्या देठाचाही सन्मान त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवतच आहेत आणि म्हणूनच प्रत्येक जिह्यात त्यांचे मंदिर आम्ही बांधणार आहोत. हे केवळ मंदिर नसेल तर एक संस्कारपीठ असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.




एकतर गद्दारांनी आम्हाला पाच वर्षे पूर्ण करू दिली नाहीत. अडीच वर्षांत जी कामे आम्ही केली त्याची कधी शोबाजी केली नाही. कारण कर्जमुक्ती म्हणा किंवा अजून काही निर्णय, मी माझे कर्तव्य पार पाडले. तुमच्यावर उपकार केले नाही. मी कधी येऊन अहंकार नाही दाखवला. शेखी मिरवली नाही. आज देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ यांचे 'आपण तिघे भाऊ भाऊ, महाराष्ट्र लुटून खाऊ,' असा प्रकार सुरू असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.


विधानसभेत विदर्भाने आतापर्यंत भाजपला भरपूर आमदार, खासदार दिले. मात्र भाजपने तुम्हाला काय दिले, असा सवाल त्यांनी केला. आम्ही पिण्याचे पाणी दिले, सिंचनाचा अणुशेष भरून काढला. मी तर ठरवले होते गोसीखुर्दचे पाणी पश्चिम विदर्भात आणायचे आणि आजूबाजूच्या परिसराला पिण्याचे पाणी द्यायचे.मात्र ह्यांनी सरकार पाडले. इथे येणारे प्रकल्प गुजरातला नेले. आता का विदर्भातली मुले गुजरातला कामाला जाणार का?. तुमच्या योजना तुम्हाला लखलाभ होवो, असा टोलाही त्यांनीही लगावला. शेतकरी भिक नाही हमीभाव मागतो. आम्ही सोयाबिनला दहा-बारा हजार भाव दिला. कापसाला भाव दिला. मात्र आता खोटय़ांचा बाजार भरला आहे. हे विदर्भ खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.



तत्पूर्वी बाळापूरचे उमेदवार आमदार नितीन देशमुख ताले यांनी जन समुदायाला संबोधित करीत आपले अनुभव कथन केले. सभेला प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली.





उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशालरुपी मोबाईल टॉर्च उंचावण्याचे आवाहन करताच विराट जन समुदायाने प्रतिसाद देत हात उंचावत मोबाईल टॉर्च दाखविले. हे दृश्य विहंगम दिसत होते.






टिप्पण्या