ठळक मुद्दे
तीस वर्षांनंतर पश्चिम अकोला मतदारसंघात काँग्रेसने रोवली विजयी पताका
भाजपाच्या गडात काँग्रेस उमेदवार साजिद पठाण यांची विजयी घोडदौड
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : जिल्ह्यातील हाय व्होल्टेज ठरलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात अखेर तीस वर्षांनंतर काँग्रेसने विजयी पताका लावली आहे. गेल्या तीस वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी विजयाची घोडदौड केली. या निकालाने भाजपाला धक्का लागला असून भाजपाच्या गोटात शांतता निर्माण झाली होती.
अकोला जिल्ह्यातील पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी पंधराशे मतांच्या जवळपास लीड घेत विजयश्री खेचून आणला.
गत सहा टर्म पासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांचे एकछत्री वर्चस्व होते. काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ स्व. गोवर्धन शर्मा यांनी जिंकून भाजपाचा गड बनविला होता. या मतदारसंघात गेल्या सहा टर्म पासून भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. गत निवडणुकीत काँग्रेसचे साजिद खान यांचा याच मतदारसंघात निसटता पराभव झाला होता. यंदा पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत काँग्रेसने काँग्रेसने साजिद खान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. पक्ष श्रेष्ठींनी दर्शविलेला विश्वास साजिद खान यांनी सार्थ ठरवत अखेर या मतदारसंघात तब्बल तीन दशकानंतर भाजपाचे मातब्बर उमेदवार विजय अग्रवाल यांना पराभूत करीत विजयाची पताका रोवली.
मोदी , योगींचा नारा ठरला फोल
भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अकोल्यात प्रचारसभा पार पाडल्या. या सभेत बटेंगे तो कटेंगे चा नारा लगावत हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. मात्र या नाऱ्याला आणि जातीय प्रचाराला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी बळी न पडता साजिद खान यांना भरघोस मतांचा आशीर्वाद दिला. एकंदरीत साजिद पठाण यांना मिळालेली मते बघता या मतदारसंघात मोदी, योगी यांचा नारा फोल ठरला असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ मतदारांनी दिली.
सर्वच समाज बांधवांचे आभार - साजिद खान
आज मला मिळालेले मताधिक्य हे मतदारांचे माझ्यावरती असलेल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाला मी सार्थ करणार असून या मतदारसंघात आगामी काळात विकास करणार. तसेच मतदारसंघात निर्माण झालेली जातीय तेढ येत्या पाच वर्षात पूर्णपणे संपवणार. आज मला सर्वच समाजातून मतांरुपी भरघोस प्रमाणात आशीर्वाद मिळाला आहे, मी सर्व समाज बांधवांचे आभार मानतो आणि आपल्या प्रेमाचा सदैव कृतज्ञ राहील अशी प्रतिक्रिया साजिद खान पठाण यांनी दिली.
सर्वप्रथम शिवाजी महाराजांना अभिवादन
निवडणूक निकालानंतर साजिद खान सर्वप्रथम कौलखेड चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करीत हार अर्पण केले. यावेळी कौलखेड मधील मतदारांनी दिलेल्या प्रमाबाबत साजिद यांनी आभार मानले. तर संग्राम गावंडे यांनी यावेळी साजिद खान यांचे कौलखेड चौक येथे शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून स्वागत केले. कौलखेड परिसरात माजी मंत्री गुलाबराव गावंडे, संग्राम गावंडे, पंकज गावंडे यांसह सर्वांनी जे अथक परिश्रम घेतले त्यांचे आपण ऋणी असल्याचे साजिद यावेळी म्हणाले.
जातीय प्रचाराला बळी न पडता विकासाला मतदान - प्रकाश तायडे
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच निवडणुकीला जातीय रंग देण्यात आला होता. जातीच्या नावावर विविध अपप्रचार करण्यात येत होते मात्र या मतदारसंघातील मतदारांनी जातीय प्रचाराला बळी न पडता या मतदारसंघात विकासाला मतदान केले असल्याची प्रतिक्रिया प्रकाश तायडे यांनी दिली.
काँग्रेसच्या गोटात जल्लोषाचे वातावरण
गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेसला अपयश येत होते. मागील निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचे उमेदवार साजिद खान यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा मात्र या निवडणुकीत भाजपाच्या गडाला सुरुंग लावत काँग्रेस उमेदवार साजिद खान यांचा दणदणीत विजय झाला. साजिद यांच्या विजयाची घोषणा होताच काँग्रेसच्या गोटात मोठ्या प्रमाणात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. तर स्वराज्य भवन येथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला. एवढ्या वर्षाने पुन्हा एकदा स्वराज भवन प्रांगण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा