accident-on-kapshi-road-patur: कापशी रस्त्यावर अपघात; मोटर सायकलची टक्कर, दोन ठार, नागरिकांनी केला रास्ता रोको आंदोलन




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

पातूर: अकोला महामार्गावरील कापसी रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ 21 नोव्हेंबरच्या रात्री सुमारे 8 ते 8:30 वाजता क्रमांक MH 30 BU 6424 आणि MH 30 BH 0804 या दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच एक युवक गंभीर जखमी झाला. ही टक्कर इतकी जोरदार होती की मोटारसायकली पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या.


या घटनेनंतर कापसी आणि चिखलगाव येथील नागरिकांनी घटनास्थळीच रास्ता रोको आंदोलन केले. 


राजंदा फाट्यापासून कापसीपर्यंत एक बाजूचा सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे कापसी, चिखलगाव, सिंदखेड, बार्सिटाकळी आणि इतर गावांतील लोकांना चुकीच्या दिशेने गाड्या चालवाव्या लागतात, त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत असतात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि या मार्गावरील समस्या लवकर सुटाव्यात यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


या घटनेनंतर बालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी पडघन अकोल्याचे तहसीलदार सुरेश कवडे, पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड, पातूर पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी आणि आर.सी.पी. पोलीस फोर्स घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 


अकोला तहसीलदारांनी नागरिकांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि या परिसराची पाहणी करून लवकरात लवकर या मार्गावर सर्विस रोड उभारणे आणि अन्य समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सुमारे 2-3 तासांनंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन संपवले.


संतप्त नागरिकांना शांत करण्यात, तसेच जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आर.सी.पी. पोलीस फोर्स, स्थानिक नागरिक, दुल्हे खान युसूफ खान आणि स्वप्नील सुरवाडे यांचे मोठे योगदान होते.


पातूर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, कापसी रस्त्यावरील शांताई मंदिराजवळ घडलेल्या अपघातात चिखलगाव येथील विठ्ठल संजय चांदूरकर (21 वर्षे) आणि पंडित महादेव राव इंगळे (45 वर्षे, जलालाबाद रहिवासी) यांचा मृत्यू झाला. तर गोपाल ज्ञानेश्वर अडकणे (चिखलगाव) गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात विपरीत दिशेने आलेल्या मोटारसायकल चालक MH 30 BU 6424 विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 125B, 281 आणि 106 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पातूर पोलीस स्टेशनद्वारे सुरू आहे.

टिप्पण्या