balapur-assmbly-constiuency: बाळापूर विधानसभा मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संदीप पाटील यांचा मतदारसंघावर दावा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. आज सायंकाळ पर्यंत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. अशातच जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. या ठिकाणी भाजपचा प्रबळ दावा असल्यावरही शिवसेना शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. अजित पवार गटाचे नेते संदीप पाटील यांनी या मतदार संघावर दावा केला आहे.




एकीकडे भाजप कडून जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघावर दावा केला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही दोन जागेसाठी आग्रही आहे. एकंदरीत यासर्व वातावरणात बाळापूर साठी तयारी करणाऱ्या अजित पवार गटानेही हा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. 


संदीप पाटील यांनी या मतदारसंघावर महायुती कडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात अकोल्यातील बाळापूर मतदार संघावरून महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी यांच्यात मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 




बाळापूरचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळलेली आहे, असा आरोप संदीप पाटील यांनी करीत, जनता आमच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी उभी आहे. महायुतीने आम्हास संधी दिल्यास निश्चितच त्या संधीचे सोने करून विद्यमान आमदरास पराभूत करून महायुतीचा झेंडा रोवू, एवढी खात्री या मतदार संघातील जनतेमुळे मला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) इच्छुक उमेदवार संदीप पाटील म्हणाले. 

टिप्पण्या