Assembly-elections-in-Akola: अकोल्यासह विदर्भातील 60 जागा रासप स्वबळावर लढणार; विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख यांची माहिती




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती राष्ट्रीय समाज पक्षाला योग्य सन्मान न देऊ शकल्याने पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष अकोल्यातील पाच जागांसह विदर्भातील 60 मतदारसंघात स्वबळावर लढणार असल्याचे पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ. तौसीफ शेख यांनी सांगितले.



येथील हॉटेल रेजीन्सी मध्ये गुरूवार (ता.17) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


यावेळी युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे, अकोला तालुकाध्यक्ष सागर दनोरीकर, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष स्वाती काकोडे, दादाराव ढगे, विश्वनाथ जावरकार, प्रविण नंदाणे उपस्थित होते. 



यावेळी डॉ. तौसीफ शेख म्हणाले, की मागील विधानसभा आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे घटक पक्ष म्हणुन लढलो. लोकसभेत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, आम्हाला केवळ परभणीची जागा देऊन भाजपमधीलच कुटील राजकारणामुळे आमचा तेथे पराभव झाला. आगामी विधानसभेत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गट यांच्यातच जागा वाटपावरून वाद सुरू असल्याने आम्हाला योग्य सन्मान मिळेल, अशी आशा धुसर झाल्याने पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेच्या 288 जागा स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. त्यानुषंगानेच गेल्या सहा महिन्यापासून आम्ही विदर्भासह राज्यभर मेळावा, बैठका घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले.


उमेदवारांची यादी 19 तारखेला जाहीर करणार असून स्फोटक मतदार संघाची यादी 22 तारखेला जाहीर करणार असल्याचेही तौसीफ यांनी म्हटले आहे. यादरम्यान महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाच्या संपर्कात असून विदर्भातील अकोला, वाशिम , बुलढाणा येथे पक्षाचं खातं निश्चितपणे उघडणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या