assault-on-journalist-in-vivara: पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर विवरा येथे प्राणघातक हल्ला






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावचे रहिवाशी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर सोमवारी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान विवरा येथे प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली असून त्यात ते सुदैवाने बचावले. त्यांच्यावर सध्या अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस ठाणे हद्दीत घडलेला प्राणघातक हल्ला हा पूर्व-वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर घडल्याचे समोर येत आहे. प्राथमिक माहिती नुसार, त्यांनी काही काळापूर्वी स्थानिक पातळीवरील काही लोकांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते, ज्यामुळे या घटनेला वैयक्तिक रागाची किनार लागली आहे. हल्ला सुयोजित होता आणि त्यामागे एक कट रचला गेला होता, ज्यामध्ये चार ते पाच जणांचा सहभाग होता. हल्लेखोरांनी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास मुर्तडकर यांच्यावर  सशस्त्र हल्ला चढवला.



सचिन मुर्तडकर यांच्यावर झालेला हल्ला हा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आलेला आहे, आणि विशेषतः पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याचे सूचित करते. समाजातील चुकीच्या गोष्टी उघडकीस आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होत असतील, तर हा लोकशाहीच्या दृष्टीने एक गंभीर प्रश्न असल्याचे वरिष्ठ पत्रकारांनी म्हंटले आहे.


वृत्त प्रकाशित केल्यानंतर हल्लेखोरांनी हे वैमनस्य मनात ठेवून हा हल्ला केला असावा, आणि या हल्ल्याचा उद्देश मुर्तडकर यांना ठार मारण्याचा होता, असे प्रथम दर्शनी दिसते. मुर्तडकर यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने जबर मारहाण केली असल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शरीरावर बऱ्याच ठिकाणी मुका मार लागला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्रकार मुर्तडकर यांच्यावर अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी पत्रकार वर्तुळातून होत आहे. दरम्यान आज जिल्हयातील पत्रकारांचे शिष्ट मंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून घटनेचा निषेध करून, हल्लेखोरांना त्वरित अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी करणार आहेत.

टिप्पण्या