- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
AI-in-the-agriculture-sector-pkv: शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर काळसुसंगत - डॉ.आर. सी. अग्रवाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 56 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
विद्यापीठा अंतर्गत सर्वोत्तम कार्य करणाऱ्या उत्कृष्ट कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय, कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, उत्कृष्ट शिक्षक, कृषि संशोधक, विस्तार संशोधक, प्रक्षेत्र व्यवस्थापक पुरस्काराचे वितरण
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आपल्या देशाची दिवसे गणिक वाढत जाणारी लोकसंख्या लक्षात घेता येणाऱ्या भविष्यात शेती क्षेत्रालाच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार असून पर्यायाने कृषी विद्यापीठांची व्याप्ती अधिकच वाढणार असल्याने काळाची गरज लक्षात घेता शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर अधिक लाभदायक ठरेल असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उपमहासंचालक डॉ.आर. सी. अग्रवाल यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 56 वा स्थापना दिन शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात अतिशय उत्साहात संपन्न झाला त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्ह्णून उपस्थित विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी वर्गाला संबोधन करतांना ते बोलत होते.
कृषी शिक्षण, कृषि संशोधनासह कृषि विस्तार कार्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक अग्रेसर होत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी इतर विद्यापीठानी अवलंबिलेले तंत्रज्ञान व प्रयोग आपलेकडे देखील रुजविणे गरजेचे असल्याचे सांगताना कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेती विषयातच आपले व्यावसायिक करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असून प्रोसेसिंग आणि मार्केटिंग मध्ये अधिक वाव असल्याचे डॉ. अग्रवाल यांनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले व युवा पिढीने अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करीत शेतीकडे वळण्याचे आवाहन सुद्धा याप्रसंगी केले. नवीन शैक्षणिक धोरणाने कृषी क्षेत्राला नव दिशा देण्याचा प्रयत्न केला असून युवा पिढीसाठी शेती क्षेत्रात नवनवीन दालने उपलब्ध झाली आहेत असे देखील डॉ. अग्रवाल म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे भरभरून कौतुक करताना डॉ. अग्रवाल यांनी विद्यापीठाचे उपक्रम देशपातळीवर इतरही विद्यापीठांना राबवता यावे याकरता प्रयत्नशील राहू असे आश्वासक प्रतिपादन देखील आपल्या मार्गदर्शनात केले.
येणाऱ्या काळात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला देशभरातील अग्रगण्य दहा कृषी विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्यासाठी विद्यापीठातील सर्वच घटक तन-मन-धनाने कृतिशील असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. अकोला कृषी विद्यापीठाच्या गत पांच दशकांच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त करताना डॉ. गडाख यांनी विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू, कार्यकारी परिषद सदस्य,शास्त्रज्ञ, अधिकारी, कामगार यांचे प्रति ऋण देखील याप्रसंगी व्यक्त केले व विद्यापीठातील सर्वच घटक शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी संकल्पना कृतीत उतरविण्यासह कौशल्य प्राप्त कृषी पदवीधर निर्मिती साध्य करण्यामध्ये सर्वार्थाने प्रयत्नशील असल्याचे सांगत येणाऱ्या तीन वर्षात विद्यापीठाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे दृश्य परिणाम दिसतील असा आशावाद देखील याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
आज डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने स्थापन झालेल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचा 56 वा स्थापना दिवस सोहळा अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रसंगी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपमहासंचालक शिक्षण डॉ. राकेश चंद्र अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ.विलास खर्चे, संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, नियंत्रक प्रमोद पाटील, कुलसचिव सुधीर राठोड, सहयोगी अधिष्ठाता डॉ.राजेंद्र गाडे, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. शैलेश हरणे, डॉ. प्रमोद वाकळे, डॉ. विलास अतकरे, नागपूर येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन शाखेचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश कडू, उपकुलसचिव डॉ. सतीश ठाकरे यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती.
यंदाच्या विद्यापीठ स्थापना दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्वोत्तम सेवांनी आणि परिश्रमाने विद्यापीठ पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, कृषी विज्ञान केंद्र, कृषी संशोधन केंद्रासह उत्कृष्ट संशोधक, उत्कृष्ट विस्तार संशोधक, प्रक्षेत्र व्यवस्थापक यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये कृषी महाविद्यालय अकोलाला सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालयाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर कृषी तंत्र विद्यालय, मुल मारोडा (जि. चंद्रपूर ) यांना उत्कृष्ट कृषी तंत्र विद्यालयाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांना उत्कृष्ट कृषी संशोधन प्रकल्प पुरस्कार तर कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा (जि. वर्धा) यांना उत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांमध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश्वर शेळके यांना उत्कृष्ट शिक्षक, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय काकडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधक, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, जिल्हा वर्धाचे प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांना उत्कृष्ट विस्तार संशोधक पुरस्कार आणि विभागीय फळ संशोधन केंद्र, काटोल चे डॉ. हितेंद्रसिंग गोरमनगर कृषी यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक तर मध्यवर्ती संशोधन केंद्र अकोला अंतर्गत वाशिम रोड फार्मचे शंकर देशमुख यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापनाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.
याप्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. शामसुंदर माने यांनी शिक्षण विषयक, मा. डॉ. विलास खर्चे यांनी संशोधन विषयक तर मा. डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी कृषी विस्तार विषयक आढावा व उल्लेखनीय उपलब्धींचे सादरीकरण केले.
तत्पूर्वी, कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठाचे प्रेरणास्थान आदरणीय डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते माल्यार्पण करून, दीप प्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठ गीताचे गायन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर राठोड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान आज विद्यापीठ स्थापना दिना निमित्त सकाळी ठीक आठ वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते विद्यापीठ ध्वज फडकवून विद्यापीठ स्थापना दिनाचे कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी माननीय कुलगुरू डॉ.शरद गडाख व इतर मान्यवरांनी विद्यापीठ शहीद तथा स्व.पंजाबराव देशमुख यांना पुष्पाजली अर्पण करीत आदरांजली दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा