felicitation-ceremony-akl-city: जेष्ठ रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: समाजाची विस्कटलेली घडी नीट करण्यासाठी आज वारकरी संप्रदायाच्या शिकवणीची समाजाला खरी गरज आहे. ही शिकवण रस्त्यात पडलेला दगड बाजूला ठेवायला सांगते. दगड मारायला नव्हे! अशा शिकवणीच्या सेवाकार्यामुळेच आपणास राज्य शासनाचा ज्ञानोबा- तुकोबा हा पुरस्कार लाभला असून या पुरस्कारामुळे सेवकार्याची जबाबदारी वाढली आहे.मात्र धर्मापेक्षा कोणीही मोठा नाही.हा पुरस्कार खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा पुरस्कार असून हा संताच्या नावाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार खऱ्या अर्थाने वारकऱ्यांचा असल्याचे मत सत्कारमूर्ती, ज्येष्ठ रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांनी व्यक्त केले.


आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पच्या वतीने प्रमिलाताई ओक सभागृहात राज्य शासनाचा ज्ञानोबा- तुकोबा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गुरुवर्य, रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


यावेळी हभप पाचपोर महाराज आपल्या सत्काराला उत्तर देत होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सह संघ चालक नागपूर येथील श्रीधरराव गाडगे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूरचे विश्वस्त गुरुवर्य हभप शिवाजी महाराज मोरे उपस्थित होते.


हभप संजय महाराज पाचपोर पुढे म्हणाले,वास्तविक हा पुरस्कार साधू संतांच्या आशीर्वादाचा पुरस्कार आहे. आपण सातत्याने तथा किर्तनाच्या समवेत मानवीय सेवा कार्याला अग्रक्रम दिला असल्याचे त्यांनी सांगितले.


कथेच्या माध्यमातून संकलित राशी गोमाता संगोपन, मंदिर जीर्णोद्धार,व बाल संस्कार शिबिरासाठी सातत्याने उपयोगात आणली जाते. आपल्याला आदर्श गो सेवा संस्थेच्या रचनात्मक सेवा कार्यापासूनच सामाजिक सेवा कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. 


ते पुढे म्हणाले,वारकरी संप्रदाय हा बहुआयामी संप्रदाय आहे. गाथा, ज्ञानेश्वरी व भागवताच्या अधिष्ठानावर हा संप्रदाय रचला आहे. या अनुषंगाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने राज्यातील पहिले पुरोगामी असल्याचे हभप पाचपोर महाराज यांनी सांगितले. वारकरी संप्रदाय हा विशाल हृदयाचा संप्रदाय असून यामध्ये जातीपातीला कोणत्याही प्रकारचा थारा नाही.म्हणूनच या संप्रदायाचे हृदय हे मोठे असून येथे संतत्व संप्रदायाच्या सेवा कार्यामुळे आपसूक प्राप्त होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


या पुरस्काराने आपल्यामध्ये खचितच अभिमान निर्माण न होता आपणास भगवंताने अशीच आयुष्यभर सेवा करीत राहण्याची शक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना ही त्यांनी यावेळी करीत सर्वांचे आभार मानले. 


कार्यक्रमाचा प्रारंभ विठ्ठल पूजा, दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन, माजी अध्यक्ष रतनलाल खंडेलवाल, रमेशचंद्र चांडक, ॲड. मोतीसिंह मोहता,किशोर पाटील, सोनू देशमुख आदींच्या उपस्थितीत सत्कारमूर्ती हभप संजय महाराज पाचपोर यांचा शाल श्रीफळ, मानपत्र व चांदीची गोमाता प्रदान करून भावपूर्ण गौरव करण्यात आला.किशोर पाटील, सोनू देशमुख यांनी अतिथींचे स्वागत केले. 



यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज हभप शिवाजी महाराज मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत संतामुळे राज्यात वैचारिक चळवळ सुरू झाली असल्याचे सांगितले. या अनुषंगाने रंजल्या गाजल्यांची सेवा करणारे हभप संजय महाराज ही विदर्भाची शान असल्याचे त्यांच्या बहुआयामी सेवा कार्यामुळेच त्यांचा शासनाने गौरव केला असल्याचे सांगितले. गोसेवा ही श्रेष्ठ सेवा असून या गोसेवेच्या माध्यमातून त्यांचे सेवा कार्य सातत्याने सुरू असून देशात वाढत चाललेली गोहत्या बंद व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


आपल्या अध्यक्षीय मनोगतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे यांनी वारकरी संप्रदाय हा रसाळ वाणीचा संप्रदाय असल्याचे सांगितले. अभंगांच्या कवित्वाला जेव्हा रसिकत्वाची धार येते त्याच रसिकत्वातून परमेश्वरी तत्वांचा उगम होत असल्याचे सांगितले. समाजाला जागवण्याचे कार्य संत करीत असून संतामुळेच शिवकालीन राज्य टिकून राहिले असल्याचे सांगून सत्कारमूर्ती हभप संजय महाराज पाचपोर यांच्या कार्याचा गुणगौरव त्यांनी यावेळी केला. 


दरम्यान सत्कारमूर्ती हभप संजय महाराज यांच्या अनेक संस्था, सेवा ,संघटनांनी सत्कार केला. यामध्ये राजेश्वर मंदिर, अकोला अर्बन बँक, विश्व हिंदू परिषद अकोला, शाक्तिधाम सेवा समिती, राम नवमी शोभायात्रा समिती, विठ्ठल नामजप मंडळ, विठ्ठल परिवार अकोला, श्रद्धासागर संस्थान अकोट, राधाकृष्ण सत्संग मंडळ,मुक्ताई मंडळ कौलखेड, मधुरत्न गोरक्षण ट्रस्ट कान्हेरे सरप, वडगाव मेंढे ग्रामस्थ मंडळ, हनुमान संस्थान यावलखेड, माजी महापौर अश्विनीताई हातवळणे, उज्वला देशमुख, संस्कृती संवर्धन समिती,गोमाजी महाराज भागवत समिती नागझरी, संस्कृती संवर्धन समिती, सद्गुरू धाम गोशाळा चिकलठाणा,कर्ता हनुमान मंडळ दाबकी रोड ,नाना उजवणे परिवार, लोकसेवा समिती, हरिप्रिया गोशाळा, गणपती अथर्वशीर्ष मंडळ, तेली विकास मंच, गोपाळकृष्ण गोरक्षण  कानशिवणी, वारकरी साहित्य परिषद खामगाव, स्वामी अक्षयानंद आश्रम अंबाशी, कन्नड मंडळी समवेत महानगरातील अनेक सेवा, संस्थांनी शाल श्रीफळ देऊन महाराजांचे स्वागत केले. पाहुणे परिचय व मानपत्र वाचन हभप प्रशांत महाराज ताकोते यांनी तर संचालन व आभार आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाचे सचिव प्रा विवेक बिडवई यांनी केले. यावेळी आ. रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, गोपाल खंडेलवाल, रामेश्वर पुंडकर, सदानंद महाराज,तायडे महाराज, हभप संतोष पिसे, मेहत्रे, डॉ प्रवीण चौहान, प्रकाश लोढिया, कृष्णा शर्मा, रामभाऊ भिरड, विनायक  बोरकर, धनंजय मिश्रा, सहदेव शिंदे, प्रशांत पिसे, रमाकांत घोगरे, समीर थोपटे, दीपक मायी समवेत विविध गावावरून आलेले हभप ,महिला पुरुष नागरिक व आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाचे समस्त विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या