akola-kawad-palkhi-festival-: वरुणराजाने श्रीराजराजेश्वराला केला अभिषेक; मुसळधार पावसातही शिवभक्तांची गर्दी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शेवटचा श्रावण सोमवार निमित्त आज पहाटेपासूनच पुरातन श्री राज राजेश्वर महादेवाच्या मंदिरात श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी मुसळधार पावसातही भाविकांनी गर्दी केली आहे. श्री राज राजेश्वर नगरीत 80 वर्षापासून कवाड पालखी उत्सवाची परंपरा आहे. वाघोली ( गांधी ग्राम) येथून पूर्णा नदीचे पवित्र जल आणून राजेश्वराला अभिषेक करण्याची अशी ही परंपरा आहे. काल रात्रीच कवाडधारी गांधीग्राम कडे रवाना झाले होते. आज पहाटे पासून सर्व कवाड पालखी शहराकडे मंदिराच्या दिशेने निघाल्या आहेत. आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. सर्व पालख्यांचे  वरुण राजाने वर्षावृष्टी करुन स्वागत केले आणि राजेश्वराला जलाभिषेक केला. BAnews24 



यावर्षीच्या पारंपारिक कावड व पालखी उत्सवात लहान मोठ्या सर्व धरून 140 च्या जवळपास पालख्या व 200 च्या जवळपास कावडचा सहभाग असल्याचे दिसत आहे.





श्रावण मास सुरु झाल्याने शंकराचे भक्त साेमवारी व्रत कैवल्य करुन महादेवाची भक्तीभावाने पूजा अर्चा करीत असतात. त्यामुळे शिवालयात भक्त दर्शनासाठी येतात. आज शेवटचा श्रावण सोमवारी अकोल्यात साजरा होणारा पालखी कावड उत्सवामुळे गर्दीत आणखी भर पडली आहे. राजेश्वराच्या पालखीचे दर्शन करण्यासाठी दूरवरून भाविक अकोल्यात पोहचले.



राजेश्वर महादेवाच्या मंदिरासह शहरातील श्री खोलेश्र्वर, श्रीमाणकेश्वर, श्रीजागेश्र्वर, श्री विश्व मानव मंदिर, श्री बारा ज्योतिर्लिंग मंदिर, श्री हरीहर मंदिर आदी मंदीरात अलंकार भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली.



अकोलाचे ग्रामदेवत श्री राजेश्वर महाराज मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज शेवटचा श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी श्री राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. शिवपिंडीवर फुलांची सुंदर आणि आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. भाविकांनी बेलपत्र वाहून जलाभिषेक तर कुणी दुग्धाभिषेक केला.



महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या होत्या. मंदीरात यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर प्रशासनाने भक्तांची कोणतीही गैरसोय होवू नये, यासाठी चोख व्यवस्था केली होती. राज राजेश्वर मंदिराचा परिसर यावेळी भक्तांनी फुलून गेला होता.



राजेश्वर पालखीच्या दर्शनासाठी गर्दी


पहिली मानाची श्री राजेश्वर शिवभक्त मंडळाची पालखी राजेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजताच्या सुमारास पोहचली. पालखीने राजेश्वराला एक प्रदक्षिणा घालून मंदिर परीसरात  सुमारास विसावली. दरम्यान कावडधारीनी पहिला जलाभिषेक केला. पालखीचे ध्वजधारी आणि त्यानंतर भव्य त्रिशूळधारी यांनी राजराजेश्वराला प्रदक्षिणा घातली. 


मानाच्या राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या पालखी पाठोपाठ दुसरी मानाची पालखी श्री ओंकारेश्वर आणि तिसरी मानाची पालखी श्री माणकेश्वर मंडळाने प्रदक्षिणा पुर्ण BAnews24 केल्या. यावेळी मंदिर परीसरात अलोट गर्दी झाली होती. हर हर महादेवचा गजर सोबत गुलाब पाकळ्या आणि गुलाल उधळून भाविकांनी पालख्यांचे स्वागत केले.


दरम्यान, बारा ज्योतिर्लिंग पदयात्रा शिवभक्त मंडळ अकोला ही शेवटची पालखी सकाळी 6:30 गांधी ग्राम हून निघाली. सर्व पालख्यांचे पालखी मार्गावर ठीकठिकाणी पूजन व स्वागत करण्यात आले.



दोन घटना वगळता सेवा, सुरक्षा व व्यवस्था सर्व सुरळीत पार पडली.  पहीली घटना रात्री दोन वाजता एकाला पाण्यात बुडताना आपती व्यवस्थापन पथकाने वाचविले. तर दुसऱ्या घटनेत अकोल्यातील एक कावडधारी शिवभक्त पालखीचे सामान असलेल्या गाडीतून खाली रोडवर सकाळी 4:45 वाजता गांधीग्राम येथे कोसळुन जखमी झाला होता. माहीती मिळताच पथकाच्या जवानांनी प्रथमोपचार करून पथकाच्या रुग्णवाहिकेने संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे सेवक ज्ञानेश्वर म्हसाये, दीपक गांजरे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 


पालख्यांमुळे गांधीग्राम ते अकोट फैल पर्यंत रोड जाम होता. यासाठी मोठी कसरत करावी लागली. विशेषत सर्व पालखी कावडधारी शिवभक्तांनी साईड दिल्याने जखमीला वेळेत रूग्णालयात पोहचविता आले, अशी प्रतिक्रिया पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.



पोलिसांची करडी नजर 


पोलीस दलातर्फे अकोला शहर कावड पालखी पारंपारीक मार्गावर चोख बदोबस्त तैनात केला आहे.  राजराजेश्वर मंदीर परीसर ते गांधीग्राम पर्यत सेक्टर पेट्रोलिंग करीता पोलीस मनुष्यबळ व वाहने तैनात आहेत. मिरवणुक मार्गावरील सर्व आवश्यक त्या ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियमन या करीता वाहतुक पोलीस अंमलदार यांची नेमणुक केली आहे. तसेच सर्व महत्वाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, बॅरीगेटस, टॉवर लावले असुन घातपात विरोधी पथका तर्फे तपासणी करण्यात येत आहे. सर्व यंत्रणा द्वारा प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची करडी नजर आहे. कावड बंदोबस्त करीता शहरात 01 अपर पोलीस अधीक्षक, 04 उपविभागीय पोलीस अधिकारी, 14 पोलीस निरीक्षक, 36 सपोनि- पोउपनि तसेच 749 पोलीस अंमलदार व 800 होमगार्ड, 4 जलद प्रतिसाद पथक, 8 स्ट्रायकींग फोर्स यासह राज्य राखीव पोलीस बल 01 कंपनी तैनात केली  आहे.



आज दोन सप्टेंबर रोजी अंतिम श्रावण सोमवार असून, यावर्षी श्रावणात पाच श्रावण सोमवार आले आहेत.  2 सप्टेंबरच्या पाचव्या सोमवारी अमावास्या असून पोळा सण आहे. या दिनी हा पालखी कावड उत्सव होत आहे. अकोल्यात पोळा सण देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्राचीन पोळा चौकात आणि जुने शहरातील शिवाजी नगर आणि हरीहर पेठ वेस जवळ पारंपारीक पद्धतीने पोळा सण साजरा केला जातो. त्यामुळे पालखी उत्सव सर्व मंडळाने सायंकाळ पाचं वाजे पर्यंत आटोपता घ्यावा, असे आवाहन पालखी कावड उत्सवाची सर्वस्वी धुरा सांभाळणारे तथा मानाच्या पहिल्या पालखी मंडळ राजेश्वर शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावजी यांनी केले आहे.






टिप्पण्या