akl-guardian-minister-missing: बेपत्ता पालकमंत्र्यांना शोधून डोलीत बसवून अकोल्यात आणू; आमदार नितिन देशमुख यांचा ना. विखे पाटील यांना इशारा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे बेपत्ता झाले असून, त्यांना शोधून काढत अकोला जिल्हयात डोलीत बसवून आणू, असे विधान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे.


शासकिय विश्रामगृह येथे आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितीन देशमुख यांनी अकोला जिल्ह्याचे  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर असलेला रोष व्यक्त केला. राधाकृष्ण पाटील हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा त्यांना विसर पडला असल्याचे देखील यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले. अकोला जिल्ह्याचा मागील अडीच वर्षात गुन्हेगारीचा चढता आलेख तयार झाला आहे. गुन्हेगारीचे हे प्रमाण राधाकृष्ण पाटील यांच्या कार्यकाळात अधिकच वाढले असून, पालकमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यात एवढ्या मोठ्या घटना होऊन सुद्धा पालकमंत्री म्हणून आपले कर्तव्य निभावले नाही. विखे पाटील यांनी अकोल्यात यावं. काझीखेडला जावं आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जावं. काझीखेड घटनेत शाळकरी मुलींवर जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने गैरवर्तन केले. हे प्रकरण अवघ्या महाराष्ट्रात गाजत असताना पालकमंत्र्यांनी अकोल्यात येऊन या घटनेचा आढावा घ्यावा किंवा चौकशी करावी, असे  तसुभरही वाटले नाही. तसेच शेतकऱ्यांचे सोयाबीनला शेंग नाही अन् पराटीला बोंड नाही, अशी शेतकऱ्यांची स्थिती असताना पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांना भेटावसे वाटत नाही.  पालकमंत्री आणि त्यांचे पक्ष केवळ हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या गोष्टी करतात. यांचे हिंदुत्व कोणते आणि यांचा विकास कुठला, असा सवाल आमदार देशमुख यांनी यावेळी केला. 




अकोला जिल्ह्यात 451 महिला तर 248 पुरुष बेपत्ता आहेत. यातील 350 जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही. अकोल्यात भर दिवसा हत्यासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. महिला मुलींवर रोजचे अत्याचार होत आहेत. आर्थिक गुन्हे आणि दरोडासारखे प्रकरण घडत आहेत. तरीदेखील पालकमंत्री यांना या परिस्थितीची जाणीव नाही ही विचार करण्यासारखी बाब आहे, असे म्हणत आमदार देशमुख यांनी अकोल्यात घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला.


हे सर्व गुन्हे महायुतीच्या कार्यकाळात एक वर्षाच्या आत घडले. परंतु अकोला जिल्ह‌याचे पालक मंत्री ना. विखे पाटील  यांनी एकदाही अकोल्यात भेट दिली नाही. कायदा व सुव्यवस्था एवढी ढासळली आहे की, गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही. पालकमंत्र्यानी अकोल्याच्या जनतेला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत असल्याचे आमदार देशमुख म्हणाले.




याउलट महाविकास आघाडीच्या कार्यकाळात अकोला जिल्हयाचे पालकमंत्री ना. बच्चू कडू  हे दर आठवड्यात अकोल्याला भेट देत होते. सर्व परिस्थितीचा आढावा घेत होते. प्रशासनावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे अकोला जिल्हयाचा क्राईम रेट कमी होता, अशी पुष्टी जोडत सध्या अकोला जिल्हयात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे आणि दहशतीचे वातावरण असल्याचे देशमुख म्हणाले.



येत्या 23 तारखेपर्यंत पालकमंत्री अकोल्यात आले नाही तर आम्ही हजारो शिवसैनिक अहमदनगरला (अहिल्यादेवी नगर) जावून पालकमंत्र्यांना शोधून काढून त्यांना पालखी-डोलीत बसवून अकोल्यात घेवून येवू. पालकमंत्र्यांना शोधण्यासाठी आम्ही 24 तारखेला शासकीय विश्रामगृह जवळ एकत्र येवून, त्यानंतर श्रीराजराजेश्वराचा आशीर्वाद घेऊन सकाळी 11 वाजता राजेश्वर मंदिर येथूनच आम्ही नगरकडे प्रस्थान करू, अशी माहिती यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिली.




पत्रकार परिषदेतला आमदार नितीन देशमुख यांच्यासह जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, माजी आमदार हरिदास भदे, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, विकास पागृत, गजानन बोराळे, दिलीप बोचे, योगेश्वर वानखडे, राहुल कराळे, ज्ञानेश्वर म्हैसने, युवा सेनेचे अभय खुमकर, विशाल घरडे, सुरेंद्र विसपुते, प्रदीप गुरुखद्दे, प्रकाश डवले, गोपाल भटकर, बबलू देशमुख, अश्विन कपले, अजय ताथोड, शिवा मोहोड, राजू पावडे, दीपक पाटील, उज्ज्वल काळणे, मुरली पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





टिप्पण्या