भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगरपालिका क्षेत्रातील डाबकी रोडवरील मुख्य रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली १८ मार्च रोजी स्थायी समिती सभागृहात नगररचना, बांधकाम, अतिक्रमण, पाणीपुरवठा, विद्युत आणि विधी विभागाची विशेष बैठक घेण्यात आली.
बैठकीत अधिकाऱ्यांना जाब
या बैठकीत डाबकी रोडवरील रस्त्याचे काम दोन वर्षांपासून रखडले असल्याबाबत नगररचना, बांधकाम व अतिक्रमण विभागातील अधिकारी तसेच पश्चिम झोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
रस्त्यालगत असलेल्या छाया हॉस्पिटल व इतर कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकाम तसेच पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याची बाबही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली.
अतिक्रमण हटवण्याची कारवाई का नाही?
नगररचना विभागाकडून रस्ता रुंदीकरणासाठी अनेक वेळा मार्किंग करण्यात आले असतानाही अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही, अशी नाराजी सभापतींनी व्यक्त केली.
काही मालमत्तांबाबत प्रकरण न्यायालयात असल्याचे सांगण्यात आले असले तरी विधी विभागाने तत्काळ पाठपुरावा करून प्रकरणे निकाली काढावीत, असे निर्देश देण्यात आले.
१५ दिवसांत अतिक्रमण हटवण्याचे आदेश
बैठकीत विभागांमधील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसून आल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आली.
सभापती विजय अग्रवाल यांनी संबंधित विभागांना पुढील निर्देश दिले:
ठळक मुद्दे :
डाबकी रोडवरील रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे
रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे १५ दिवसांत हटवावीत
टीडीआरसाठी आलेल्या अर्जांवर तात्काळ निर्णय घ्यावा
नगररचना, बांधकाम, अतिक्रमण व क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वय साधून काम पूर्ण करावे
बैठकीला मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीस उपमहापौर अमोल गोगे, नगरसेवक अनिल गरड, नितीन ताकवाले, अमोल मोहोकार, नगरसेविका मंजुषाताई शेळके यांच्यासह मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, शहर अभियंता नीला वंजारी, कार्यकारी अभियंता अजय गुजर, सहा. नगररचनाकार मृलालिनी मानतकर, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे, मालमत्ता अधिकारी संदीप गावंडे, विधी अधिकारी शाम ठाकूर, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांना दिलासा मिळणार?
डाबकी रोडचे काम दीर्घकाळ रखडल्याने परिसरातील नागरिकांना वाहतूक, धूळ व दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मनपाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई झाली तर या भागातील रस्त्याचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा