भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन सोहळा राज्यभरात विविध जिल्ह्यात साजरा करण्यात येत असतो गतवर्षी पुणे येथे हा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला होता. यावर्षी हा मान अकोला जिल्ह्याला मिळाला असून गुरुवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रामदास पेठ पोलीस ठाण्याजवळील मंगल मराठा मंगल कार्यालयात हा एक दिवसीय 21 वा वर्धापन दिन सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये राज्यभरात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीची मीमांसा व पक्षाची रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अकोला युवक जिल्हाध्यक्ष केशव मुळे यांनी दिली. या कार्यक्रमात देशभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही मुळे यांनी सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आयोजित या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अकिसागर, राष्ट्रीय संघटक गोविंदराव शिवराम, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील पाल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, आमदार रत्नाकर गुट्टे गंगाखेड, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉक्टर कौशिक शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
गत लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष होता. लोकसभा निवडणुकीत भाजपा समवेत रासपची युती होती. आता मात्र पक्षाचे संस्थापक महादेवराव जानकर यांच्या मार्गदर्शनात आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी की भाजपासोबत युती करावी याचा निर्णय या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात घेणार आहे.
तथापि अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार ताकदीने उभे राहणार असल्याची भूमिका या वर्धापन दिन कार्यक्रमात मांडण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील हा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून, यामध्ये भारत देशभरातील विविध स्थळावरून पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असून यामध्ये पक्षाची आगामी रणनीती व भूमिका ठरविण्यात येणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात मिशन विधानसभा 2024 चे लक्ष देण्यात येणार असून त्या दृष्टीनेही पक्षाची मोठी वाटचाल सुरू राहणार आहे.
विदर्भातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या एकदिवसीय वर्धापन दिन सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रासपचे विदर्भ सचिव गणेश मानकर, अकोला जिल्हाध्यक्ष दादाराव ढगे, महिला जिल्हाध्यक्ष किरण इंगळे, जिल्हा युवा अध्यक्ष केशव मुळे, सुनील वानखेडे, युवा जिल्हा साचिव अंकुश बाळापुरे, राजू डोंजेकार, अंकित ढोरे,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे, अकोला महानगर अध्यक्ष इम्रान मिर्झा, कमल सुरूसे, विश्वनाथ जावरकर, आनंद गोठाकडे, सुभाष गावंडे, सागर धानोरीकर, प्रमोद काळे, मंगेश तोलमारे, ओम गावंडे, राधे सोळंके, संदीप उमाळे, यश सोनटक्के, शीलवंत खंडारे, मो.सोफियान, प्रवीण नंदाने, किरण धांडे, विनोद वाकोडे, उमेश मोहरकर, मीना गावंडे समवेत बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा