- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
raj-thackeray-mns-akola-city: आगामी निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी राज ठाकरे यांनी अकोल्यात कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नवनिर्माण यात्रा विदर्भ दौरा भंडारा येथून सुरू होवून पश्चिम विदर्भातील बुलढाणा येथे समाप्त होणार आहे. आज रविवारी सकाळी वाशिम येथून बैठक आटोपून राज ठाकरे दुपारी अकोल्यात पोहचले. विधानसभेचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज अकोल्यात ही दुसरी भेट होती.
अकोला येथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या दिशेने निघाले. राज ठाकरे यांचा उद्या बदलापूर येथे दौरा असल्याने ते आजच बुलढाणा मतदार संघाचा आढावा घेवून मुंबई कडे रवाना होणार आहेत.
आपल्या अकोला दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी कानमंत्र दिला. तर विदर्भातील काही ठिकाणच्या उमेदवारांची नाव याआधी त्यांनी जाहीर केली आहेत. मात्र अकोल्यात त्यांनी एकही उमेदवारी सध्या जाहीर केलेली नाही. असे मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
शहरातील गोरक्षण मार्गावरील मंगल कार्यालयात त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. तर यावेळी पदाधिकाऱ्यांची त्यांनी कानउघडणी देखील केली.
पत्रकारांना बाहेर जाण्याची केली विनंती
दरम्यान राज ठाकरे यांनी घेतलेल्या या आढवा बैठकीत केवळ मनसे पदाधिकारी हजर होते. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सुध्दा या बैठकीत उपस्थित राहू दिले नाही. यावेळी उपस्थित पत्रकारांना देखील त्यांनी सभागृह बाहेर जाण्याची विनंती केली. तसेच बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधण्याचा त्यांनी नकार दिला.
महाराष्ट्राला राज मामाची गरज
यावेळी एका चिमुकलीने “महाराष्ट्राला गरज आहे राज मामाची, नाही त्या १५०० रु. ची ” अस लिहलेले फलक हातात धरून उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते.
स्वागत प्रसंगी धक्काधक्की लोटालाटी
राज ठाकरे यांच्या आगमन प्रसंगी मनसे महीला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रवेश द्वारात पायऱ्याजवळ ओवाळून स्वागत केले. यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांची लोटालोटी झाली. महिलांना सुध्दा धक्का लागल्याने थोडा वेळ गोंधळ उडाला होता. यावेळी राज ठाकरे यांना बघण्यासाठी नागरिकही आले होते. राज ठाकरे यांची एक झलक आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्यासाठी येथे एकच गर्दी झाली होती. पायऱ्यावर काही जण धक्का धक्कीत पडले. तर काहींची पादत्राणे तेथेच पडली.
क्रेनद्वारे पुष्प वृष्टी
वाशिम येथून आज दुपारी अकोला शहरात दाखल होताच राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मनसेचे पदाधिकारी व मनसैनिकांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करुन आणि आतिषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी व मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
अन् त्याच कक्षात थांबले राज ठाकरे
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेचे पदाधिकारी यांच्यात काही दिवसांपूर्वीच वाद पेटला होता. मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या वाहनांची तोडफोड करून विश्रामगृहात त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आज राज ठाकरे अकोला दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहातील त्याच कक्षात ते काही काळासाठी थांबले होते.
वाशिम ते अकोला केले ड्रायव्हिंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी वाहन चालवण्याचा आनंद घेतला. वाशीम ते अकोला दरम्यान त्यांनी स्वत: 'ड्रायव्हिंग' केले. वाशिम येथे रविवारी त्यांनी पक्षाची आढावा बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना गट-तट सोडून कामाला लागण्याचे आदेश दिले.
या आढावा बैठकीनंतर ते स्वतः चारचाकी वाहन चालवत पातूरमार्गे अकोला शहरात दाखल झाले. पातूर येथे राज ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. क्रेन द्वारा विशाल पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
गोरक्षण मार्गावरील वाहतूकीला अडथळा
गोरक्षण मार्गावरील मंगल कार्यालयात आज मनसे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. पुष्पवृष्टी करण्यासाठी कार्यालयंबाहेर दोन जेसीबी उभे करण्यात आले. आतिषबाजी करण्यासाठीं फटाक्यांच्या लडी रस्त्यावर ठेवल्या होत्या. तसेच कार्यकर्तेही रस्त्यावर उभे होते. येथे येणाऱ्यांची वाहने सुध्दा रस्त्यावर उभी होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. नंतर वाहतूक एकाच मार्गाने सुरू करण्यात आली. मात्र मोठी वाहने आल्यानंतर वाहतूकोंडी निर्माण होत होती.
जय मालोकार कुटुंबियांचे सांत्वन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अकोला दौऱ्या दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणात मृत्यू पावलेल्या मनसे सैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबियांना सांत्वन देण्यासाठी अकोला शहरातील उमरी येथे भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी मृत मनसेसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची विरचापुस केली. तर पक्ष त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यानंतर ते पुढील शेगाव येथील बैठकीसाठी रवाना झाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा