life-imprisonment-murder-case :पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस आजीवन कारावासाची शिक्षा





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्वयंपाक करीत असलेल्या आपल्या पत्नीवर घासलेट टाकून तिला पेटवून देणाऱ्या संशयी वृत्तीच्या पतीस अकोला न्यायालयाने आज आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना 2014 मध्ये वाडेगाव येथे घडली होती. 




अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक -2 श्रीमती एस. सी. जाधव यांनी हा निकाल आज 8 ऑगस्ट रोजी दिला आहे. 



आरोपी मोहन विक्रम डोंगरे, (वय 55 वर्षे, रा. इंदिरा नगर, झोपडपट्टी, वाडेगांव ता. बाळापुर, जि. अकोला) यास आपल्या पत्नीचा खुन केल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



घटनेची हकीकत अशी की, आरोपी हा त्याचे पत्नीचे चारीत्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करीत होता.  29 मे 2014 रोजी आरोपीने त्याची पत्नी स्वयंपाक करीत असतांना, तिचेसोबत वाद केला व त्यानंतर तिच्या अंगावर घासलेट टाकून तिला पेटवून दिले. त्यांच्या मुलाने इतरांसह जखमीस दवाखान्यात भरती केले तेथे तहसिलद यांच्या मार्फत जखमीचे मृत्युपुर्व बयान नोंदविण्यात आले. त्यावरुन आरोपी विरुध्द बाळापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास स.पो.नी जी. एम. गुरुकर यांनी करुन दोषारोपपत्र दाखल केले.



या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता फिर्यादीसह एकुण 11 साक्षीदार तपासले. तसेच आरोपीने सुध्दा त्याचेतर्फे त्याच्या दुस-या मुलासह इतर एका साक्षीदारास तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन  न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच हेड कॉन्स्टेबल रेखा हातोलकर व सी.एम.एस. सेलचे संतोष उंबरकर यांनी प्रकरणात सहकार्य केले.



टिप्पण्या