IMA-Akola-kolkata-incident: कोलकाता मधील घटनेच्या निषेधार्थ आयएमए अकोलाचा मुक मोर्चा; बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्याची घृणास्पद घटनेचे पडसाद देश भरात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने करण्यात येत आहे. आज अकोला शहरातही डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारला असून, या बंद दरम्यान शहरातील सर्व दवाखाने वैद्यकिय सेवेसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. 


या घटनेच्या निषेधार्थ आयएमए, इंडियन डेंटल असोसिएशन, राष्ट्रीय इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, अकोला जिल्हा फिजिओथेरपिस्ट असोसिएशन आदी संघटना तर्फे एकत्रितरित्या आज सकाळी मूक मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. मात्र दवाखाने बंद असले तरी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं आय एम ए अकोला अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने यांनी स्पष्ट केले.





कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मधे सलग 36 तासांची रूग्णसेवा दिल्यानंतर सेमिनार रुममध्ये आरामासाठी गेलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या डॉक्टर विद्यार्थीनीवर अतिशय अमानुषपणे सामुहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली गेली. जवळ जवळ सर्वच मेडीकल कॉलेज मधे विद्यार्थी सुरक्षित नाहीत, त्यांच्या जिवाला केव्हाही अपाय होऊ शकतो, अशी परिस्थिती वारंवार निर्माण होते. कुठलेही मेडिकल कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कायमची उपाययोजना करीत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. विद्यार्थी त्यांची मागणी रेटून धरतात. मात्र, प्रशासन नेहमीच ढिम्मच असते. त्यामुळे अश्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत राहतात. नुकत्याच घडलेल्या या जघन्य अपराधामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये भयाचे वातावरण तयार झाले आहे. त्यात शांतपणे निषेध व्यक्त करणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांवर तसेच रूग्णालयात जो हल्ला कोलकात्यातील त्याच मेडीकल कॉलेज मधे झाला तो तर अधिकच भयावह आहे, शरीराचा थरकाप उडविणारा आहे. या सर्व लाजिरवाण्या अमानवीय घटनांच्या विरोधात आय‌एम‌ए अकोला आणि आयडिए, जिपीए, निमा, जीमा, एम‌एस‌एम‌आर‌ए, आय‌एपी, ए्एपी, पिएएमपी, एसिपीएल इत्यादी वैद्यकीय संघटनांनी एकजुटीने अकोल्यात जाहीर निषेध मुक मोर्चा आयोजित केला होता. 



या मुक मोर्चात जवळ जवळ 1500 डॉक्टर्स उत्फुर्तपणे सहभागी झाले होते. 



हा निषेध मोर्चा आय‌एम‌ए येथून सकाळी 9 वाजता सुरू होवुन दुर्गा चौकातुन अग्रसेन चौक मार्गे टॉवर चौकातुन परत आय‌एम‌ए हॉलला 11 वाजता सभा संपन्न होऊन समाप्त झाला. 



सभेमध्ये प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांवरील वाढत्या हिंसाचाराबद्दल रोष व्यक्त करून कडक उपाययोजना करायला हवी, असे स्पष्ट मत मांडले. 



या निषेध मोर्चासाठी पोलिस बंदोबस्त एकदम चोख होता. प्रत्येक चौकात सहभागी डॉक्टरांना सुरक्षित चौक पार पाडता यावा यासाठी पोलिसांची बऱ्यापैकी दमछाक ही झाली. 



मोर्चेकऱ्यांसाठी डॉ. रविंद्र चौधरी, डॉ. प्रमोद चिराणीया आणि डॉ. गजानन भगत यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंस्फूर्तीने केली होती. 




या मोर्चात आय‌एम‌ए अध्यक्ष डॉ. राजेंद्रकुमार सोनोने, सचिव डॉ. सागर भुईभार, डॉ. नितीन उपाध्ये, आयडिए चे अध्यक्ष डॉ. सचिन वानखडे, निमाचे डॉ. पंकज गुप्ता, डॉ. शाम शर्मा, जि पी ए चे डॉ. उटांगळे, डॉ. विनय दांदळे, एएपीचे डॉ. लढ्ढा, एम‌ एस‌ एम‌ आर‌ ए चे शशिकांत देशमुख, उमाकांत पाटील, एसिपीएलचे संजय सरोदे, डॉ. विजय जाधव जिपीए, डॉ. योगेश सरोदे आदी सहभागी झाले होते.

टिप्पण्या