morna-river-rajeshwar-setu-akl: मोर्णा नदीत चार वर्षीय मुलगा गेला वाहून ; राजेश्वर सेतू वरील घटना, शोध जारी





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: चार वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत दुचाकीने (MH 30 AD 3817) मोर्णा नदीतील राजराजेश्वर सेतू वरून जात असताना नदीत पडून वाहून गेल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. बचाव पथक घटना स्थळी पोहचले असून, मुलाचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.


दोघ बापलेक आज राजेश्वर सेतू वरून जात होते. अचानक वडिलांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि मुलगा नदीत पडला. मुलाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. जय सचिन बोके असे या चिमुकल्याचे नाव असून, शिवसेना वसाहत येथील रहिवासी असल्याचे समजते.






काल रात्री अकोला जिल्ह्यातील पातुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जुन्या शहराला नवीन शहराशी जोडणारा राजेश्वर सेतू आज सकाळी पाण्याखाली गेला होता. 






जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सेतू ओलांडण्यास मनाई केली आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र सेतुवरील पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी ये - जा सुरू केली. यातच बोके बापलेक सेतुवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या सेतुला कठडे नसल्याने ही दुचाकी काठावर पडली आणि मुलगा नदीत पडून वाहून गेला. भविष्यात आणखी अशी दुर्दैवी घटना घडू नये, याकरिता प्रशासनाने येथे त्वरित कठडे बांधावे, अशी मागणी आजच्या घटनेमुळे जोर धरू लागली आहे.


टिप्पण्या