akola-court-life-imprisonment: क्षुल्लक कारणाहून शेजाऱ्याची हत्या; आरोपीस न्यायलयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा, गुलजारपुरा येथील घटना






भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गुलजारपुरा मध्ये क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला होता. यावादात एकाची हत्या झाली होती. 2022 मधे घडलेल्या या घटनेतील आरोपीस न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.



दिनांक 19 जुलै 2024 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला  राजेश तिवारी यांनी आरोपी आकाश दिलीप जोटागे (रा. रामभाऊची चाळ, गुलजारपुरा अकोला) यास सत्र खटला क्रमांक 80/2022 मध्ये भारतीय दंड विधान कलम 302 अंतर्गत दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


घटनेची हकीकत अशी की, 02 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11 वाजताचे सुमारास आरोपी आकाश जोटांगे व त्याचे शेजारी राहणारे संतोष मोरे यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. यातच आरोपी आकाश याने संतोष यांच्या छातीवर व पोटावर चाकुचे वार करुन हत्या केली. घटनेच्या वेळेस मयत संतोष मोरे यांचा मुलगा रोहित, मुलगी कोमल व मोहल्ल्यातील गजु मेहरे हजर होते. सदर घटनेबाबत डाबकी रोड पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल होवून त्याचा तपास झाल्यावर आरोपीविरुध्द न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.


सदरहू सत्र खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा व परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरुन व दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकुन न्यायालयाने आरोपीस भा.द.वि. कलम 302 अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व रुपये 10 हजार दंड ठोठावला. तसेच भा.द.वि. कलम 323 अंतर्गत आरोपीस 6 महिने सश्रम कारावास व रुपये एक हजार  दंड व दंड न भरल्यास 1 महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपी खटला सुरु असतांना न्यायालयीन कोठडीत होता.


या प्रकरणात जिल्हा सरकारी वकिल ॲड. आर. आर. उर्फ गिरीश देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली.   प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक  जगदीश जायभाय यांनी केला व सी. एम.एस. पैरवी अधिकारी ए.एस.आय. उकंडा जाधव व पोलीस स्टेशन पैरवी संजय घोगरे यांनी सहकार्य केले.



टिप्पण्या