robbery-in-businessman-home: न्यू आळशी प्लॉटमध्ये उद्योजकाच्या घरी सशस्त्र दरोडा; मुलाचे नाव घेत पोलिसांच्या वेषात दरोडेखोर घुसले घरात





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व खदान पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू आळशी प्लॉट येथील एका घरात सशस्त्र दरोडा घालून मुद्देमाल लुटल्याची घटना काल गुरुवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली.  उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानाला दरोडेखोरांनी निशाणा बनवून शस्त्रांचा धाक दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. दरोड्या नंतर दरोडेखोरांनी चारचाकी वाहनातून पळ काढला. ही चारचाकी गाडी परिसरातील एका ठिकाणच्या सीसीटिव्हीत कैद झाली आहे.




काल रात्री अकोला शहरातील न्यू आळशी प्लॉट येथे 5 दरोडेखोरांनी एका घराला निशाणा बनवला. हे 5 दरोडेखोर एका चारचाकी गाडीतून आले आणि एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घराची बेल वाजवली. विशेष म्हणजे वृद्ध दाम्पत्याच्या मुलाचे नाव घेत त्यांनी घराची बेल वाजवली. या दाम्पत्याचा मुलगा मुंबई येथे वास्तव्यात आहे, तर वृद्ध दाम्पत्य हे एकटे या घरात राहत आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील दोन दरोडेखोर हे पोलिसांसारखे खाकी कपडे परिधान करून आले, आणि एक मुलगी तुमच्या घरात घुसली असल्याचं सांगत आम्ही तिला शोधत आहो म्हणत घरात प्रवेश केला. यावेळी घरात वृद्ध दाम्पत्यासह घरकाम करणारी महिला कामगार सुद्धा हजर होती. दरोडेखोरांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून वृद्ध दांपत्याकडून सोन्याची आंगठी, चेन आणि मोबाईल असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लुटला. यानंतर दाम्पत्याने आरडाओरड केला असता दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.




या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन धंदर त्यांच्या ताफ्यासह केडिया यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.  पोलीस अधिकारी व पथकाने घटना परिसराची पाहणी केली. परिसरातील सीसीटिव्ही तपासले. यात शेजारी राहणाऱ्या अलिमचंदाणी यांच्या घरातील सीसीटीव्हीत दरोडेखोरांची पांढऱ्या रंगाची गाडी जातांना कैद झाली आहे. पोलीस आता दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत. अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करून प्रकरण तपासात घेण्यात आले आहे. लवकरच दरोडेखोर मुद्देमालासह पकडल्या जातील,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. 


टिप्पण्या