nationalist-congress-student : महिलांना सुरक्षा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबध्द; वसतिगृह सामूहिक अत्याचार व ग्रामसेविका छळ प्रकरण मुद्दे येत्या अधिवेशनात उपस्थित होणार







भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केले? आणि त्यांना कोणत्या अडचणी आल्या? त्या अडचणी सोडवायला  काय केले पाहिजे आदी प्रमुख प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँगेस विद्यार्थी सेल प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि महिला विदर्भ अध्यक्ष माधुरी पालीवाल हे महाराष्ट्रात दौरा करीत आहेत. त्यानिमित्ताने आज अकोल्यात आले होते. 




यावेळी प्रामुख्याने अकोल्यातील महिलांवरील अत्याचारबाबत तसेच विद्यार्थांचा कॉलेज प्रवेश, त्यांच्यासाठी वासतिगृहे आणि शिष्यवृत्ती आणि समस्या याबाबत विस्तृत  विचारमंथन करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडविण्यासाठी  प्रधान्यक्रम द्या  यासाठी  पक्षांध्यक्ष तथा  उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे निर्देश असल्याचे सांगत तश्या सूचना आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाश्यक्ष प्रशांत कदम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. जिल्हा आढावा घेतल्यानंतर  आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.



अभ्यास महोत्सवाचे आयोजन होणार

हा संघटनात्मक दौरा अकोला, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नागपूर, सोलापूर, पुणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आजच्या अकोला दौऱ्यामध्ये आढावा बैठकीदरम्यान अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सूचनापेटी ठेवणार आहे असे यावेळी प्रशांत कदम यांनी सांगितले 


नागपुर येथे भव्य रोजगार मेळावा

राष्ट्रवादी काँगेस विद्यार्थी आघाडीच्या केवळ राजकिय दृष्टया काम करीत नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे या दृष्टीकोनातून प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून येत्या 13 जुलै रोजी नागपूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती माधुरी पालीवाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच राज्यातील विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी काँगेस सदैव तत्पर आहे. अकोल्यातील मुलांच्या वसतिगृहातील सामुहिक अत्याचार मधील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलनही करू, असे पालीवाल म्हणाल्या.



अकोल्यात विद्यार्थांना भेडसावणाऱ्या  समस्या बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस  प्रत्येक ठिकाणी धावून गेला पाहिजे. यासाठी वैभव घुगे याची अकोला शहर अध्यक्षपदी  नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वासतिगृहात झालेल्या गँगरेप आणि इतर अपराधीक घटनाबाबात  त्यांनी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांसाठी राज्यभर अभ्यास सेमिनार आयोजित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


अकोल्यात युवती महिलांना सुरक्षा देण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज 


शहरात सामूहिक बलात्कार  व बलात्कार, विनय भंग सारखी प्रकरणे घडत आहेत. यामुळे शहरात महिला, युवती, आणि त्यांचे नातेवाईक दहशतखली आले आहेत. आता नुकतेच कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कॉलेज परिसरात आणि शिकवणी वर्गात जाणाऱ्या तसेच बाहेर गावावरून शिक्षणासाठी अकोला शहर मध्ये भाड्याने खोल्या घेऊन तसेच वासतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर  आला आहे. यासाठी सामाजिक संघटना,  युवती, महिलासाठी कार्य करणाऱ्या संघटना, संस्था, राजकीय पक्षांच्या महिला विंग यांनी जागृत राहून युवती, महिलासाठी सुरक्षा प्रदान करणेसाठी पुढे येणे अत्यावश्यक  झाले आहे. यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने हेल्प लाईन नंबर  जाहीर केला आहे. अशीच अपेक्षा इतरांकडूनही व्यक्त होत आहे .



शहरातील महिला व विद्यार्थिनी यांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस विभागाने  112 टोल  फ्री हेल्प लाईन नंबर जाहीर केलेलाच आहे तर पोलीस विभागाने खास महिला पोलिसांची नियुक्ती  करून दामिनी पथकाचीही  स्थापना केली आहे. या पथकातील महिला पोलीस दिवसरात्र सतर्क राहून कॉल येताच तात्काळ उपस्थित होतात. मात्र तरीही छेड काढण्याच्या व बलात्काराच्या घटना घडतच आहेत त्यात दिवासेंदिवस वाढचं होत आहे. ही मानसिकता बदलण्याची नितांत गरज असून त्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.


कॉलेज व शिकवणी वर्ग परिसरात विद्यार्थिनींची छेड काढणे, विनयभंग आणि त्याही पुढे जाऊन बलात्कार सारख्या घटनासाठी  महिला, युवती  तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांनी पुढे आले तरच राज्य महिला आयोग, पोलीस विभाग व आमच्यासारखे महिला विंग त्यांना सुरक्षा व न्याय देण्यासाठी पुढे येऊ शकते त्यासाठी तक्रार करण्यासाठी पुढे आलेच पाहिजे त्यासाठी अकोल्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचा  हेल्प लाईन जाहीर केला असल्याचे मत महिला विंग विदर्भ अध्यक्ष  माधुरी पालीवाल यांनी व्यक्त केले 



राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जाहीर केला हेल्प लाईन नंबर 


शिकवणी वर्ग परिसर,कॉलेज परिसर, व इतर ही ठिकाणी विद्यार्थिनींची छेड काढण्यासाठी रस्त्यावरील मजनू  उशिरा पर्यंत शहरात फिरत असतात. आणि छेड काढून विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत असतात. याबाबत कुठे तक्रारी करायच्या याबाबत त्यांच्यात  आत्मविश्वास नसतो आणि तक्रार केल्यावरही त्यांना सुरक्षा मिळेल कीं नाही याबाबत त्या साशंक असतात. त्यामुळे त्या तक्रार करणे  टाळतात. मात्र ही बाब हेरून आजच नियुक्त झालेले शहर अध्यक्ष वैभव  घुगे यांच्या मार्गदर्शनातं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने 7030300604 हा हेल्प लाईन नंबर जाहीर केला आहे. यावर संपर्क होताच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस त्या पीडितेला सुरक्षा आणि पुढील मार्गदर्शन साठी तत्पर असणार आहेत अशी माहिती आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम यांनी दिली आहे.



अकोल्यातील महिलांवरील अत्याचार प्रकरणे विधिमंडळ मध्ये होणार उपस्थित

 

सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सामूहिक बलात्काराची घटना  आणि नामवंत शिक्षण संस्थेचे वस्तीगृह  याबाबत सखोल चौकशी करून  तसेच जिल्ह्यात  घडलेले ग्रामसेविका विनयभंग प्रकरण  व इतर प्रकरणे जाणून घेऊन हे मुद्दे येत्या अधिवेशांनात  उपस्थित केले जाणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.




यावेळी आमदार अमोल मिटकरी, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम (छ. संभाजी नगर), महिला विदर्भ अध्यक्षा माधुरी पालीवाल (नागपूर), महिला जिल्हाध्यक्ष रूपाली वाकोडे, प्रदेश सरचिटणीस गणेश शिंदे, सरचिटणीस सादिक खान, शहराध्यक्ष विजय देशमुख, गटनेता मनोज गायकवाड, शहर उपाध्यक्ष अक्षय बालटे, यश सावल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या