भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहरातील व्यापारी दिनेश बुब यांना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास गंभीर जख्मी करून त्यांचेकडील 2,50,000 रूपयेची बॅग जबरीने हिसकवणाऱ्या आरोपींना आज पोलीसांनी अमरावती येथून अटक केली आहे. पाच पैकी दोन आरोपी अल्पवयीन असून, सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर 24 तासाच्या आत या प्रकरणाचा पोलीसांनी छडा लावला, हे येथे उल्लेखनीय आहे.
दिनेश भगवानदासजी बुब (वय 60 वर्ष, रा. शिवाजी चौक मुर्तीजापुर,) हे 8 जुन रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास त्यांचे मालकीचे नायरा पेट्रोलपंप येथुन त्यांचे चारचाकी वाहनामध्ये बसुन घरी जात होते. पेट्रोल पंपापासुन 200 मीटर अंतरावर स्मशान भुमी जवळ अनोळखी तीन इसमानी बुब यांची कार अडवुन कारवर लाकडी दांडयाने बोनेटवर मारले. बूब हे कार खाली उतरले असता, त्या इसमांनी त्यांचे डोळयामध्ये मीरची पावडर टाकली. यानंतर बुब यांचे पाठीवर डाव्या बाजुस व डाव्या हातावर गुप्तीने वार करून जख्मी केले. बुब यांचे कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यामध्ये नगदी 2,50,000 रूपये कारमधुन जबरीने काढुन त्यांचे मोटार सायकलवर बसुन तीन्ही अनोळखी इसम निघुन गेले.
यानंतर बुब यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधान कलम 395,34 अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. गुन्ह्याचे तपासात मिळालेल्या गुप्त माहीतीवरून तसेच तांत्रीक माहीतीचे आधारे पोलिसांनी अनिकेत राजकुमार वर्घट वय 24 वर्ष, सम्यक धनंजय थोरात वय 20 वर्ष (दोन्ही रा. प्रबुध्द नगर, वडाळी अमरावती),पवन उमेश दहीहंडेकर वय 19 वर्ष (रा.श्रीरामनगर मुर्तीजापुर) तसेच दोन विधी संर्घषीत बालक यांना वडाळी कॅम्प अमरावती येथुन ताब्यात घेतले. त्यांनी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली हीरो कंपनीची पॅशन (प्रो मो सा क एमएच 27 डी सी 8466) किंमत अंदाजे 50 हजार, ॲपल कंपनीचा मोबाईल किंमत 70 हजार रूपये, नगदी 31 हजार रूपये असा एकुण 1,51,000 रूपयेचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची कसून चौकशी करणे सुरू आहे. लंपास केलेली रक्कम बाबत आरोपींनी अद्याप खुलासा केला नाही. या आरोपींच्या मागे अजून कोणी मास्टर माईंड असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ही यशस्वी कारवाई विषेश पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोपळे, पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक भाउराव घुगे, पोलीस उपनिरिक्षक गणेश सुर्यवंशी, पोलीस हवालदार नंदकिशोर टिकार, सुरेश पांडे, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोलीस कॉस्टेबल सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भूषण नेमाडे, सायबर पोलीस स्टेशनचे गोपाल ठोंबरे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरिक्षक भाउराव घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा