भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आपल्या प्रतिष्ठानवरून रात्री घरी परतत असलेल्या पेट्रोलपंप संचालकाला अज्ञात आरोपींनी रस्त्यावर अडवून, धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांच्या जवळील अंदाजे तीन लाख रोख रक्कम लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री मुर्तीजापुर रोडवर घडली. यामध्ये व्यवसायिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मूर्तिजापूर येथील दिनेश भगवानदास बुब यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर नायरा पेट्रोल पंप असून ते रोज पेट्रोल पंपावर जात असतात. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या पेट्रोल पंपावर चार चाकी गाडीने गेले असता रात्री 9 वाजताच्या सुमारास ते पेट्रोल पंपावरील अंदाजे तीन लाख रुपये रोख रक्कम घेऊन परत मूर्तिजापूरकडे घरी येत होते.
दरम्यान, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरील महामार्गावर अज्ञात आरोपींनी काठी मारून त्यांची कार अडवली. आरोपींनी त्यांना बळजबरीने कारमधून बाहेर खेचून त्यांच्याजवळ ठेवलेले पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने विरोध केला असता हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले व पैसे लुटून पळ काढला. गंभीर अवस्थेत असलेल्या व्यावसायिकाला उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, सिटी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास भगत, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शेळके, सिटी पोलीस ठाण्याचे डी. बी. पथकाचे मंगेश विलेकर, सचिन दुबे आदी ताफासह घटनास्थळी पोहचले. पुढील तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा