lok-sabha-election-result-2024: आमदार रणधीर सावरकर ठरले 'किंगमेकर'!



ठळक मुद्दा 

अकोला जिल्ह्याच्या राजकारणावर आमदार रणधीर सावरकर यांचे निर्विवाद वर्चस्व स्थापन 


                           


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 





अकोला: काल अकोला लोकसभा मतदार संघाचा निकाल लागला. माजी केंद्रीय राज्यमंत्री व खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव आणि भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे हे या निवडणुकीत विजयी झाले. अकोला लोकसभा मतदार संघात कुणाचा विजय होईल हे छातीठोकपणे कुणीही सांगू शकणार नाही, अशी निवडणूक स्थिती होती. पण अटीतटीच्या निवडणुकीत भाजपने अखेरच्या डावात बाजी मारली.



ही निवडणूक संजय धोत्रे आजारी असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थित झाली, हे सर्वश्रुत आहे. उमेदवार अनुप धोत्रे हे संपूर्ण अकोला लोकसभा मतदार संघात परिचित नाहीत. डॉ अभय पाटील यांच्या सारखा दमदार उमेदवार प्रतिस्पर्धी आहे. तेंव्हा अनुप धोत्रे यांचा निवडणुकीत टीकाव लागणार नाही, अशी चर्चा मतदार संघात जोर धरत होती. निवडणुकीच्या सुरवातीला भाजपाचे कार्यकर्ते अशा थोडयाफार संभ्रमात होते. पण ह्या सर्व चर्चा खोट्या ठरविण्यात अहोरात्र कार्यरत होते भाजपाचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर.





संजय धोत्रे आजारी असल्यामुळेच रणधीर सावरकर यांनी दोन अडीच वर्षा पूर्वीच अकोला जिल्ह्याची भाजपाची पुढील वाटचालीची जबाबदारी स्वीकारली होती. पक्षाने त्यांना जिल्हाधक्ष केले. ही जबाबदारी जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांना व सहकार्यांना सोबत ठेऊन त्यांनी पार पाडली. आता त्याच्याकडे जबाबदारी होती अकोला लोकसभा मतदार संघ निवडणूकीची. आमदार रणधीर सावरकर हे अकोला जिल्ह्यात आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पण कार्यकर्त्यांचे प्रशासनातील काम करताना आक्रमकपणा दाखवायचा आणि निवडणूकीला शांत संयमीपणे सामोरे जायचे हे सूत्र सावरकरांनी निवडले. भाजपाचे जेष्ठ आ. गोवर्धन शर्मा यांचेही याच कालखंडात निधन झाले होते. तेंव्हा सावरकर यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, पक्षाचे अकोटचे जेष्ठ आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आपले सहकारी विजय अग्रवाल, जयंत मसने, कृष्णा शर्मा आदिना विश्वासात घेऊन अकोला लोकसभा मतदार संघाचा उमेदवार ठरवून घेतला. जिल्हा पातळीवार अनुप धोत्रे यांच्या नावाला संघटनेचा पाठींबा घेतल्यावर सावरकर यांनी अनुप धोत्रे यांची पक्षाकडून उमेदवारी मिळवून घेतली. 




अनुप धोत्रे हे भाजपचे अकोला लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार जाहीर झाले इथं पर्यंत सर्व ठीक. पण परीक्षा अनुप धोत्रे यांना निवडणुकीत विजयी करण्याची होती. आ. सावरकर यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, पदाधिकारी यांच्याशी व भाजपच्या शिवसेना, राष्ट्रवादी आदी मित्र पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांशी उत्तम संपर्क ठेवला. प्रत्येकाचा सन्मान करीत त्यांच्यावर जबाबदारी सोपावली. त्यांच्यावर विश्वास टाकला. परिणामी आ. रणधीर सावरकर व त्यांच्या सर्व चमुचे प्रयत्न फळाला आले आणि अनुप धोत्रे यांचा विजय झाला. विधानसभा निहाय आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, अनुप धोत्रे यांना आ. सावरकरांचे अकोला पूर्व मतदार सांघातून मोठा लीड मिळाला. ही लोकसभा निवडणूक अनुप धोत्रे जिंकले.  आणि या निवडणुकीतुन हा मुद्दा देखील स्पस्ट झाला की अकोला जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आ. रणधीर सावरकर यांचे निर्विवाद वर्चस्व स्थापीत झाले. अकोला लोकसभा व जिल्हा भाजपाचे नेतृत्व यापूर्वी स्व. भाऊसाहेब लहाने, स्व. भाऊसाहेब फुंडकर, संजय धोत्रे यांनी समर्थ व दमदारपणे केले. हीच परंपरा आता आ. रणधीर सावरकर यांना पुढे चालवायची संधी मिळाली आहे. कारण, या लोकसभा निवडणूकचे किंगमेकर आ. सावरकर हेच आहेत, असे बोलल्या जात आहे.

टिप्पण्या