lok-sabha-election-result-2024: महाराष्ट्रातील अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


photo: social media 






ठळक मुद्दा 

महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीनः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



भारतीय अलंकार न्यूज 24

मुंबई: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचा दारुण पराभव झाला. त्यात भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारून मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, असे ते म्हणालेत. 



लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यात महाराष्ट्रात महायुतीने निराशाजनक कामगिरी केली. राज्यात सत्ताधारी महायुतीला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. यात भाजपला अवघ्या 9 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली. दुसरीकडे महाविकास आघाडीला तब्बल 30 जागा मिळाल्या. त्यात काँग्रेसला सर्वाधिक 13 जागा मिळाल्या. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 8 जागा मिळाल्या आहेत.

महायुतीच्या या पराभवानतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे.

मी पळून जाणारा माणूस नाही. मी या पराभवाची जबाबदारी घेतो.  पुन्हा जनतेत जाऊन नव्या जोमाने काम करेल. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यानुसार माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा व मला पूर्णवेळ विधानसभेसाठी झोकून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही जनादेश मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महायुतीमधील मित्रपक्षांसोबत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाल्याचेही यावेळी मान्य केले. आमच्या मित्रपक्षांसोबत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झालेत. त्याची आम्ही नोंद घेतली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यासंबंधीचा योग्य तो निर्णय घेतला जाईल. आम्ही नव्याने रणनीती आखून कामाला सुरुवात करू, असे ते म्हणाले. 

देशात केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली होती. या इंडियाला एकत्रित जेवढ्या जागा मिळाल्या, त्याहून अधिक जागा देशात भाजपला मिळाल्या. विरोधकांनी मोदी सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपला त्यांच्याहून अधिक जागा जिंकण्यात यश आले, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.



टिप्पण्या