cholera-outbreak-health-akola: बेलखेड मध्ये दूषित पाण्यामुळे कॉलराची साथ; आरोग्य यंत्रणा सज्ज




ठळक मुद्दे 

*बेलखेडमध्ये कॉल-याचे रूग्ण; तत्काळ औषधोपचार सुरू

*घरोघरी सर्वेक्षण करा; आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा

*जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश 



भारतीय अलंकार, न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि. 1 : तेल्हारा तालुक्यातील मौजे बेलखेड येथे गावातील नागरिकांना कॉलरा रोगाची लागण झाली असून, रूग्णांवर तत्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांकडून माहिती मिळताच जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तातडीने व्हीसीद्वारे विविध यंत्रणांची बैठक घेतली व आवश्यक औषधोपचार, तसेच घरोघरी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.  



आयसोलेशन वॉर्ड कार्यान्वित आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणी अहवालानुसार बेलखेडमध्ये दुषित पाण्यामुळे सदर आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर आजाराच्या प्राथमिक लक्षणानुसार गावातील नागरिकांना अतिसार व उलट्या होत असून त्यानुसार प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार देण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर आजाराच्या अनुषंगाने बेलखेड गावामध्ये आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आला आहे. तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 



जिल्ह्यात शहरे व गाव स्तरावर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल, यासाठी महानगरपालिका, सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींनी  आवश्यक कार्यवाही करावी. ग्राम स्तरावर सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी तातडीने गुडमॉर्निंग पथके गठित करावी. गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी ही कार्यवाही तत्काळ करावी, असे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.  

हा आजार दुषित पाण्यामुळे उद्भवत असल्याने नागरिकांनी पाणी उकळून थंड करुन पिण्यासाठी वापरावे तसेच घरातील लहान मुले, महीला, वृध्द नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी. सदर आजाराच्या अनुषंगाने नागरीकांना काही त्रास जाणवल्यास तात्काळ स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुणालय, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय तथा सर्वोपचार रुग्णालय आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. सदर आजाराच्या अनुषंगाने बेलखेड येथे आयसोलेशन वार्ड कार्यान्वित आहे, तसेच ग्रामीण रुग्णालय तेल्हारा आवश्यक खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बेलखेड व ग्रामिण रुग्णालय तेल्हारा येथे पुरेशे मनुष्यबळ, आवश्यक औषध साठा, बेड, अॅम्ब्युलन्स, तज्ज्ञ डॉक्टराचे पथक उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच बेलखेड गावामध्ये घरोघरी आरोग्य विषयक सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.



नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सदर आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले आहे.



बेलखेड येथील नागरीकांनी पाणी शुध्दीकरण करुनच प्यावे.


मौजे बेलखेड (ता. तेल्हारा) येथे 26 मे पासून अतिसार, हगवण, उलटी यांचे रुग्ण आढळून आल्याने तेथे उद्रेक जाहीर करण्यात आला आहे. उद्रेक प्रतिबंध संदर्भाने जिल्हास्तरीय पथक   भेट देत असुन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.



साथीच्या अनुषंगिक माहिती


गावाची लोकसंख्या:  7695


एकुण घरे :              1403


आजपर्यंतची ओपीडी मधील 

रुग्णांची एकुण संख्या :             165


पैकी अतिसार, उलटी, 

हगवण ओपीडी मधील 

रुग्णांची संख्या:                       54


पैकी संदर्भात रुग्णांची संख्या:      03


पैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या: 46


सध्या उपचाराखाली असलेल्या 

रुग्णांची संख्या:                        08


अतिसार उलटी हगवण मुळे मृत्यु झालेल्या रुग्णांची सख्या निरंक


कार्यरत मनुष्यबळ:                 2447


वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस:     06


वैद्यकीय अधिकारी बीएएमएस:      10


सामुदाय वैद्यकीय अधिकारी:         06


एकुण पथक 13 यांच्यामार्फत दररोज बेलखेड गावातील घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करीत आहे.


तसेच पिण्याचे पाणी निर्जतुकीकरण करणेसाठी मेडीक्लोर देण्यात येत आहे. सद्यस्थितीत साथ नियंत्रणात असुन गावातील नागरीकांना गावातच स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहे. नागरीकांना वरील कोणतेही लक्षणे असल्यास त्वरीत गावात असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्वरीत तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



 

टिप्पण्या