ashadhi-wari-2024-shegaon: पाऊले चालती पंढरीची वाट…श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान





ठळक मुद्दा 

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने आज निघाली आहे.




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

शेगाव (बुलढाणा): संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकादशीसाठी आज गुरूवार 13 जुन रोजी सकाळी संत नगरी शेगाव येथून पंढरपूरकडे निघाली. श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे ब्राम्हवृंदांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या सेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थितीत आज सकाळी 7 वाजता टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. यावेळी हजारों भाविक मंदिर परिसरात उपास्थित होते. याची देही याची डोळा हा पालखी सोहळा पाहताना भाविकांचा आनंद द्विगुणीत झाला हाेता.

संत गजानन महाराज संस्थेच्या दिंडीचे यंदा हे 55 वे वर्ष आहे. या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी सहभागी झाले आहेत. पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचेल. त्यानंतर सर्व वारकरी पंढरपुरात आषाढी उत्सवात सहभागी होतील. 


पारस येथे मुक्कामी


संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आज सकाळी संतनगरी शेगाव येथून निघाला. श्रीक्षेत्र नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थान येथे दुपारचे भोजन घेतले असून विश्रांतीनंतर पालखी सोहळा पारस येथे मुक्कामी रवाना होईल. 


उद्या गायगाव येथे स्वागत; भौरदला मुक्काम 


14 जून रोजी पालखी पारस येथुन निमकर्दा मार्गे गायगाव येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोहचेल. गावाच्या वेशीवर पालखीचे स्वागत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल. पालखीतील भक्तांच्या भोजनाची व्यवस्था श्री शंकर संस्थान येथे करण्यात आली आहे. येथे श्रींच्या पालखीसाठी व भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्यात यावा, यासाठी शेगाव संस्थानतर्फे अतिशय सुंदर असा मंडप टाकण्यात येवून पालखीच्या दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात येते. दुपारी पालखी भौरद गावी मुक्कामासाठी रवाना होईल.


15 व 16 ला पालखी राजेश्वर नगरीत 


राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीची अकोलेकरांना दरवर्षी प्रतीक्षा असते. यंदा पालखी आज 13 जून रोजी आषाढीवारीसाठी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली आहे. राजेश्वर नगरीत (अकोला शहर) शनिवारी 15 आणि रविवार 16 जुन रोजी पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावमधून निघणाऱ्या पालखीचा सोहळा पाहण्यासाठी अकोलेकर हजेरी लावतात. यामुळे यादृष्टीने अकोल्यातून विशेष एसटी गाड्या सोडण्यात आल्या.

आज 13 जून रोजी सकाळी श्रींची पालखी संतनगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण केले. यंदा पालखीचे 55 वे वर्ष आहे. शेगाव ते पंढरपूर 33 दिवसांची पायी वारी  करून वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. प्रवासात पालखी ठिकठिकाणी मुक्कामी राहणार आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता आणि शेकडो किलोमीटरचे अंतर करून 15 जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढावरून  विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे.




21 जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास


पंढरपूर येथे 17 जुलै रोजी आषाढी  सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्कामी राहणार आहे. नंतर 21 जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पुन्हा 22 दिवसांचा पायी परतीचा प्रवास करत श्रींच्या पालखीचे 11 ऑगस्ट रोजी स्वगृही शेगाव नगरीत आगमन होईल. 


प्रतापराव जाधव यांनी घेतले दर्शन 


दरम्यान, आज सकाळी नव निर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जावून, महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखीमध्येही ते काही अंतरापर्यंत सहभागी झाले होते.












टिप्पण्या