- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
10th-International-yoga-day-akl :अकोल्यात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा; दोन हजार योगप्रेमींनी एकाच छताखाली सादर केले प्रात्यक्षिक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी., पंतजली योग समिती, योग भारती, क्रीडा भारती, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, योग परिषद, अजिंक्य फिटनेस पार्क, योगासन व सांस्कृतीक मंडळ, प्रजापिता ब्रम्हकुमारी, संत निरंकारी मंडळ, गायत्री ग्रुप, सिंधू सिनिअर सिटीजन असोसिएशन, मॉर्निंग योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील दिक्षांत समारंभाचे सभागृह येथे आज सकाळी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन अजित कुंभार जिल्हाधिकारी अकोला व डॉ.श्री.शरद गडाख, कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर महेशसिंह शेखावत, जिल्हा समन्वयक नेहरु युवा केंद्र, अकोला, सतीशचंद्र भट जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला, राजयोगीनी रुक्मीनी दिदी प्रजापिता ब्रम्हकुमारी अकोला, संदिप हाडोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, योगासन मंडळचे डॉ. सतीश उटांगळे, पंतजली योग समितीचे हरीष पारवाणी, विजयसिंग डाबेराव राखीव पोलीस उपनिरिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र उपस्थित होते. यावेळी सुमारे दोन हजार योगप्रेमींनी सूर्यनमस्कार सह विवीध योगासन सादर केले.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 मध्ये प्रस्तावित केलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे स्वीकारत 21 जून 2015 पासून जगभरात अतिशय उत्साहात साजरा केला जाणे ही आम्हा सर्वांसाठी भूषणावह बाब असून खऱ्या अर्थाने आजचा दिवस जगभरातील लोकांना एकत्र येण्यासाठी आणि निरोगी निरामय आरोग्यासाठी पर्वणीच सिद्ध होत आहे.
"वसुधैव कुटुम्बकम" हें योग दिनाचे ब्रीद अनुसरत वसुंधरेच्या संरक्षणासाठी आपण सर्वच सिद्ध व्हावे तथा सध्याच्या धकाधकीच्या आणि शारीरिक मानसिक तणावाच्या परिस्थितीत निरोगी निरामय आनंदी जीवनासाठी योग प्राणायामा सह योग्य आहार व विहारासह सामाजिक बांधिलकी जोपासावी या राष्ट्रीय भावनेतून कृषि विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी सात वाजता सुरू झालेला हा भव्य दिव्य सोहळा नऊ वाजेपर्यंत योगा प्राणायाम ध्यानधारणा संगीत आणि आनंदाची उधळण करून गेला. याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला चे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हाधिकारी अकोला अजित कुंभार विशेषत्वाने उपस्थित होते. पतंजली योग समितीचे डॉ. सुहास काटे व त्यांचे सहकाऱ्यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. यामध्ये पतंजली योग समूह सदस्यांचे कृतीयुक्त सहकार्य लाभले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर प्रजापिता ब्रह्मकुमारी अकोला केंद्राच्या प्रमुख राज योगिनी रुक्मिणी दीदी व त्यांच्या सहकारी वर्गानी राजयोग मेडिटेशन क्रिया व तिचे महत्व विषद केले. आजचे योग दिनाच्या प्रसंगी संपूर्ण अकोला आणि परिसरातून महिला, पुरुष, अबालवृद्धा सह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
तरण तलावात योगासन सादर
आज 10 वे जागतिक योगदिन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील मोठ्या उत्साहात आज योगदिन साजरा करण्यात आला तेही जरा हटके पद्धतीने. अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियम येथील जलतरण तलावात अनेक वर्षांपासून येथील हौशी पोहणारे पाण्यात योगा करून योग दिवस साजरा करतात. आजच्या या योग दिनामध्ये 5 वर्षाच्या चिमुकली ते 80 वर्षांच्या आजोबांनी सहभाग नोंदविला. जय श्री राम ग्रुपचे हे सर्व सदस्य आहेत. आज योगदिनी यांनी पद्मासन, ताडासन, शीर्षासन शवासनसह अनेक योग आसन जलतरणपटूनी पाण्यात केले.
अकोला मनपा मधे योग दिवस साजरा
अकोला महानगर पालिका प्रशासन वतीने मनपा प्रांगणात आज सकाळी जागतिक योग दिवसाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होवून विविध योग आसन सादर केली. उत्तम आरोग्यासाठी नियमित योगासन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चंद्र नमस्कार द्वारे योग दिन साजरा
जागतिक योग दिन निमित्त अजिंक्य फिटनेस पार्क, अजिंक्य कौशल्य विकास संस्था, शुभम करोति फाउंडेशन, निरामय एज्युकेशन अँड मेडिकल रिसर्च फाउंडेशन, आर जे ट्रू-अकोला यांच्या संयुक्त विद्यमान अजिंक्य फिटनेस पार्क येथे योग दिवस साजरा करण्यात आला ज्यामध्ये सूर्यनमस्कार व चंद्र नमस्कार यामधील फरक लक्षात घेऊन चंद्र नमस्कार प्रशिक्षण प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला तसेच जिल्हा परिषद अकोला अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र 'आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र व उपकेंद्र दहीहंडा अंतर्गत गांधीग्राम आणि सांगवी मोहाडी व स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला व जलाराम मंदिर बिर्ला येथे योग दिवस साजरा करण्यात आला.
प्रभातच्या विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे
10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून प्रभात किड्स स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या योग दिवसाची थीम ‘योगा फॉर सेल्स अॅन्ड सोसायटी’ असल्याने विद्यार्थ्यांनी ह्या थिमला अनुसरून योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
योगसाधना ही विद्यार्थ्यांच्या बौद्धीक, सामाजिक, शारीरिक तसेच व्यक्तीमत्व विकासासाठी आवश्यक असल्याने त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन प्रभातच्या शिक्षीका झिनल सेठ यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रनिशा अग्रवाल व अन्वी पटेल तसेच क्रीडा शिक्षक गजानन चव्हाण यांनी विविध योगासनांचे सुंदर सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभातचे क्रीडा विभागप्रमुख संतोष लोमटे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक प्रकाश गुडीकुंडलवार यांनी मानले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा