narendra-dabholkar-murder-case: बहुचर्चित नरेंद्र दाभोलकर हत्याकांड निकाल: दोन आरोपींना जन्मठेप तर तिघे निर्दोष





भारतीय अलंकार न्यूज 24

पुणे :  बहुचर्चित डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालय (विशेष न्यायलय) ने आज शुक्रवारी निकाल जाहीर केला. दहा वर्ष आठ महिन्यापूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर पुलाजवळ नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.



महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांड मध्ये पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली होती. यापैकी न्यायलयाने आज तिघांची निर्दोष मुक्तता केली तर दोघांना जन्मठेपची शिक्षा सुनावली. न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी निकाल वाचन केले. 


दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असणाऱ्या विरेंद्र तावडे यांची निर्दोष मुक्तता केली. तर संजीव पुनाळेकर ज्यांच्यावर आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप होता, त्यांनाही न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. तसेच आरोपी विक्रम भावे हे देखील निर्दोष असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. तर आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 302 आणि कलम 34 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या दोघांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाचा कारावास होईल, असे न्यायालयाकडून निकालपत्रात नमूद करण्यात आले. 



निकालानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही आदराने स्वागत करतो. या प्रकरणात दोन जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. जे निर्दोष सुटले आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि गरजच पडल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावू, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. दोन हल्लेखोरांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्याचे एका पातळीवर आम्हाला समाधान आहे.  पण या हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि हत्या करण्यामागचा व्यापक कट याविषयीचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत, असे देखील डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले.

टिप्पण्या