court-news-balapur-crime-akl: जन्मदात्यालाच जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेकीला सश्रम करावासाची शिक्षा




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: क्षुल्लक संपत्तीच्या हव्यासापोटी जन्मदात्याच्याच जीवावर उठलेल्या मुलीने बाप आणि लेकीच्या सुंदर नात्याला काळीख फासली. 

वडील झोपलेले असताना त्यांच्या अंगावर गरम तेल ओतून मुलीने त्यांना जखमी केले होते. ही घटना 2022 मध्ये घडली होती. आज या प्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलीस भादंवि कलम 324 अंतर्गत दोषी ठरवुन 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावून वृध्द बापास न्याय मिळवून दिला.



जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 शयना पाटील यांनी 16 मे रोजी आरोपी प्रतिभा ( वय 40 वर्षे, रा. मानकी, ता. बाळापुर, जि. अकोला) हिला भा.दं.वि. कलम 324 अंतर्गत दोषी ठरवुन 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



घटनेची हकीकत अशी की, आरोपी महिला ही लग्न झाल्यावर तिचे पती सोबत पटत नसल्यामुळे वडील महादेव सिताराम सोनोने यांचे सोबतच राहत होती. आरोपीचे तीचे वडीलांसोबत घर बांधण्याचे कारणावरुन वाद होते. 22 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारच्या सुमारास आरोपीने तीचे वडील झोपलेले असताना पातेल्याने त्यांचे अंगावर सोयाबीनचे गरम तेल ओतले. ज्यामुळे फिर्यादीस गंभीर जळाल्याच्या जखमा झाल्या. घटनेनंतर आरोपी मुलीला तेथून पळुन जात असतांना वडीलांनी पाहिले. त्यानंतर गावक-यांनी जखमी महादेव सोनोने यांना दवाखान्यात भरती केले. जखमीच्या दवाखान्यात नोंदविलेल्या बयाणा वरुन आरोपी मुली विरुध्द बाळापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पी.एस.आय. भाष्कर तायडे यांनी करुन दोषारोपपत्र दाखल केले.



या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता फिर्यादी महादेव सोनोने यांचे सह एकुण 05 साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपी महिलेस भा.द.वि. कलम 324 अंतर्गत दोषी ठरवुन 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच हेड कॉन्स्टेबल रेखा हातोलकर व सी.एम.एस. सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष उंबरकर यांनी प्रकरणात सहकार्य केले.



टिप्पण्या