ramdas-peth-akola-city-crime : अकोला शहर पुन्हा हादरले; एकाच रात्री शहरात दोन हत्या





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात एकीकडे रामनवमी शोभायात्राची धामधूम सुरू असताना दुसरीकडे हत्या करण्याची कट कारस्थाने सुरू होती. बुधवार 17 एप्रिलच्या रात्री अकोला शहरात दोन हत्याची प्रकरण घडल्याने शहर पुरते हादरून गेले आहे.




सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार 18 एप्रिल रोजी (17 एप्रिलची रात्र) रात्री 1.15 च्या सुमारास अतुल रामदास थोरात, (रा. अण्णाभाऊ साठे नगर, अकोट फाईल, अकोला) या युवकाची परस्पर वैमनस्यातून रेल्वे स्टेशन चौकात हत्या झाल्याची घटना घडली आहे. अकोला येथील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणाने धारदार शस्त्राने वार करून त्याची निघृण हत्या करुन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सतीश कुलकर्णी, रामदासपेठचे एसएचओ मनोज बहुरे आणि फॉरेन्सिक विभाग त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.




या हत्येनंतर तासाभरात देशमुख फैल मधे दुसऱ्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. भवानी पेठेतील देशमुख फाईल जवळील एका घरासमोर ही हत्या घडली आहे. या हत्येत राज संजीव गायकवाड नावाच्या 18 वर्षीय तरुणाचाही धारधार शस्त्राने वार करुन हत्या झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे. 



प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रामनवमी निमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती, आणि या शोभायात्रेत राज गायकवाड हा देखील सहभागी झाला होता. या मिरवणुक दरम्यान राजचा वाद देशमुख फाईल परिसरातील काही युवकांशी झाला होता. मात्र हे प्रकरण मित्रांच्या मदतीने तेथेच मिटविण्यात आले होते. मात्र, रात्री 2 वाजताच्या सुमारास राजूच्या घरी तीन अज्ञात इसम आले आणि त्याला घराबाहेर बोलाविले. राज घराबाहेर आला असता आरोपींनी त्याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. राजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर आले असता आरोपी फरार झाले. राजला तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 



शहरात एकाच रात्री दोन हत्या घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.



टिप्पण्या