lok-sabha-elections-update: अभय पाटील यांना प्रहारचा पाठींबा; बच्चू कडू यांनी महायुती विरुद्ध थोपटले दंड

 




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : बच्चू कडू यांची नाराजी अमरावतीत याआधीच दिसून आली आहे. त्यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात आपला उमेदवार जाहीर केला. यानंतर आता त्यांची महायुती विरुद्धची नाराजी अकोल्यातही प्रगट झाली आहे. बच्चू कडू यांनी महायुती कडून वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने अकोल्यातही त्यांनी उघडपणे नाराजी पदाधिकाऱ्यां करवी व्यक्त केली आहे. महायुती विरूद्ध बच्चू कडू यांनी आता दंड थोपटले असल्याचे यावरून दिसून येत आहे. 



दरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अकोल्याचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना सहकार्य न करण्याची भूमिका घेण्यात आली. तर असा प्रस्ताव सुद्धा उद्या बच्चू कडू यांना देण्यात येणार आहे.





अकोल्यात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील यांना आपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या  पदाधिकारी यांनी बच्चू कडू यांच्या आदेशान्वये अकोल्यात एक पत्रकार परिषद घेऊन अभय पाटील यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.


प्रहारने दिलेल्या महाविकास आघाडीला पाठिंब्यामुळे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांची डोकेदुखी वाढणार आहे. आधीच भाजपचे माजी आमदार आणि ओबीसी नेते नारायण गव्हाणकर यांनी नामांकन अर्ज भरल्याने भाजपची डोके दुखी वाढली आहे.  आता प्रहारने अभय पाटलांना पाठिंबा दिला असल्याने त्यात आणखी भर पडली आहे.





लोकसभा निवडणुकीची देशभरात, राज्यात रणधुमाळी सुरु झाली आहे. पूर्वी महायुतीतील घटक पक्षअसलेला प्रहार जनशक्ती पक्ष वेगवेगळ्या भुमिका जाहीर करते आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे घोडे मैदान जवळ आले आहे. महायुती आणि महाविकास आघाड्याकडून प्रचारास जोमाने सुरुवात झाली आहे. यामध्ये 

आता प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यात सुध्दा आपली भूमिका जाहीर केली आहे. अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकत्यांची बैठक झाली असून, कार्यकर्त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना जाहीर पाठींबा दिला आहे. तसा ठराव आज  घेऊन उद्या पक्षाध्यक्ष बच्चू कडू यांना देणार आहेत. त्यांची सही झाल्यावर डॉ अभय पाटील यांना देणार असल्याचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


महायुतीने अमरावतीत खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती.आमदार बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका या आधीच जाहीर केली असून आपला उमेदवार उभा केला आहे. अकोल्यात मात्र आपला उमेदवार उभा न करता महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अभय पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे. भाजपा हिटलरशाही प्रमाणे वागते. आमदार बच्चू कडू यांनी पालकमंत्री असताना अकोला शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही अकोल्यात भाजपा प्रहार जनशक्ती पार्टीला गृहीत धरते. प्रहारच्या कोणत्याही कार्यकर्त्याला शासकीय, किंवा निम शासकीय समितीवर साधे सदस्य म्हणून घेतले नाही. याबाबत भाजपा अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची वारंवार प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली मात्र हिटलर प्रमाणे धुडकावून लावले आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी केला. 


अमरावतीत भाजपा प्रहार पार्टीच्या अध्यक्षावर बिनबुडाचे आरोप करीत अपमान करीत आहेत तर अकोल्यातही भाजपा प्रहारला विचारात घेत नाही. त्यामुळे प्रहार जन शक्ती पार्टीचा डॉ अभय पाटील यांना पाठींबा असल्याचे आज जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



आमचा नेता  प्रामाणिक आहेत.तर डॉ अभय पाटील हे लोकांचे प्रश्न सोडवतात. भाजपाने विकास केला नाही. महान, कापसी सारखी ठिकाणे  विकसित केले नाही. भाजपा प्रहारला गृहीत धरतात. त्यामुळे अकोल्यात  प्रहारचे 60 ते 70 हजार मतदार आहेत. त्यामुळे डॉ अभय पाटील यांचा विजय प्रहार निश्चित करणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.

टिप्पण्या