court-news-cheque-bounce-: दारू दुकान संचालिका चेक बाऊन्स प्रकरणात दोषी; १५ लाखांची भरपाई देण्याचा आदेश,एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा
ठळक मुद्दे
चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाचा निर्णय, रक्कम न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: देशी दारूच्या व्यवहारात उधारीवर माल घेऊन रक्कम न परतवल्याने दिलेला धनादेश वटला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने देशी दारूची किरकोळ विक्री करणाऱ्या संचालिकेला दोषी ठरवून १५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला असून, एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ठरलेल्या मुदतीत रक्कम न भरल्यास आरोपीस ४ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे.
अकोला शहरातील गांधी रोड परिसरात असलेल्या “प्रशांत लिकर एजन्सी” या फर्मने परक्राम्य लिखत अधिनियम १८८१ मधील कलम १३८ अंतर्गत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सदर फर्म देशी दारूचा घाऊक व्यवसाय करते. फर्मकडून या प्रकरणासाठी सागर अलीमचंदानी यांना अधिकृत करण्यात आले होते.
तक्रारीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पी.एच. शेवाले ही एक मालकी हक्काची फर्म असून ती पुष्पा संजय शेवाले चालवतात. आरोपी फर्म देशी दारूची किरकोळ विक्री करते. आरोपीने तक्रारदाराकडून उधारीवर दारू खरेदी करून वेळोवेळी काही अंशतः पैसे दिले. मात्र खात्याचा हिशोब केल्यानंतर आरोपीकडे एकूण १०,२४,७८३ रुपये इतकी रक्कम थकीत असल्याचे स्पष्ट झाले.
थकबाकी फेडण्यासाठी आरोपीने धनादेश क्रमांक 112620989 दिनांक १ ऑगस्ट २०२३ (रक्कम १०,२४,७८३ रुपये) दिला. हा धनादेश बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, बुलढाणा येथे आहरित होता. तक्रारदाराने हा धनादेश अकोला अर्बन को-ऑप. बँक, अकोला येथे जमा केला असता तो ३ ऑगस्ट २०२३ रोजी “Insufficient Funds” (पुरेशी शिल्लक नसणे) या कारणाने अनादरित होऊन परत आला.
यानंतर तक्रारदाराने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी कायदेशीर नोटीस पाठवून रक्कम भरण्याची मागणी केली. ही नोटीस आरोपीला ८ सप्टेंबर २०२३ रोजी प्राप्त झाली; मात्र आरोपीने ना पैसे भरले, ना नोटीसला उत्तर दिले. त्यामुळे तक्रारदारास न्यायालयात धाव घ्यावी लागली.
सदर प्रकरणाची सुनावणी ६ वे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. ए. आर. सैय्यद यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी पुष्पा संजय शेवाले यांना कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने दंड प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम २५५(२) नुसार एक वर्ष साधा कारावास सुनावला.
तसेच दंड प्रक्रिया संहिता कलम ३५७(३) अंतर्गत तक्रारदारास १५,००,००० रुपये भरपाई ३० दिवसांच्या आत देण्याचा आदेश दिला. मुदतीत भरपाई न भरल्यास आरोपीस ४ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे.
न्यायालयात आरोपी अनुपस्थित राहिल्याने तिचा जामीन मुचलका जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कलम ४१८(२) अंतर्गत वारंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भरपाईची रक्कम जमा झाल्यानंतर अपीलची मुदत संपल्यानंतर तक्रारदारास ती रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
या प्रकरणात तक्रारदाराच्या वतीने ॲड. कमल एच. आनंदानी यांनी यशस्वी बाजू मांडली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा