jyotiba-phule-birth-anniversary: अकोल्यात युगपुरुष क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन; शहरातून निघणार भव्य शोभायात्रा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: थोर, क्रांतिकारी, बहुजनांचे कैवारी फुले-शाहू-आंबेडकर यांचा वारसा लाभलेला हा महाराष्ट्र. या थोर पुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी सर्व समाजाने एकत्र येऊन साजरा केल्या व विचारात्मक साथ दिली तर बहुजन समाजात समता एकता विकासाच्या वाटा मोकळ्या होतील. त्यातून एक सुदृढ सामाजिक वातावरण समाजात निर्माण होईल, याच उद्देशाने प्रेरित होवून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. 11 एप्रिल रोजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि 14 एप्रिल रोजी भारताच्या घटनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यांना अभिवादन करण्याचे औचित्य साधून 11 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता सिटी कोतवाली चौकापासून भव्य पायदळ शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युगपुरुष क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती महोत्सव आयोजन समिती अध्यक्ष सुभाष सातव यांनी दिली. 




अशोक वाटिका येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत सुभाष सातव यांनी महोत्सव संदर्भातील माहिती दिली.


यावेळी आयोजन समितीचे सदस्य मार्गदर्शक प्रकाश तायडे, प्रा.डॉ. संतोष हुसे, जयंत मसने, ॲड. महेश गणगणे, ॲड. प्रकाश दाते, प्रवीण वाघमारे, उमेश मसने, अभिलाष तायडे, अक्षय नागापुरे, ऋषिकेश आमले, मंगेश घोडे, नीरज रहाटे, संजय तडस, मनोहर उगले, लक्ष्मण निखाडे, अविनाश बागडे, गजानन नावकार, प्रकाश बागडे, आशिष मंगरुळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.




सिटी कोतवाली चौक येथून शोभायात्रेस आरंभ होईल. गांधी चौक, प्रमिलाताई ओक हॉल समोरून मुख्य बस स्थानक मार्ग अशोक वाटिका येथे पोहचून यात्रेचे समापन करण्यात येईल. या भव्य यात्रेत सर्व सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी महोत्सव  आयोजन समितीने केले. 





शोभायात्रेत विवीध सामजिक संघटना व संस्था सहभागी होणार आहेत. यात प्रामुख्याने अखिल भारतीय माळी महासंघ, माळी युवा संघटना, क्षत्रिय माळी परिषद, फुले ब्रिगेड, युवक संघटना, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, समता पर्व, फुलमाळी संघटना, वनमाळी संघटना, समता परिषद, मुख्याध्यापक संघ, चर्मकार समाज, नाभिक समाज, मणीयार समाज, सोनार समाज, कुणबी समाज, बौद्ध समाज, धनगर समाज, वंजारी समाज, गुरव समाज, सुतार समाज, कुंभार समाज, गाडी लोहार समाज, भटके विमुक्त जाती जमाती, बारी समाज, भोई समाज तसेच ओबीसी समाजातील सर्व बारा बलुतेदार बंधू व भगिनी सहभागी होणार आहे. 



शोभायात्रेत आखाडे, दिंडी, चित्ररथ, डीजे, बँड, महिला भजन मंडळ यांचा समावेश राहणार आहे, अशी माहिती सुभाष सातव यांनी दिली.



महात्मा फुले यांचे कार्य सर्वांसाठी 



महात्मा फुले यांचे कार्य कोण्या एका समाजासाठी नाही. त्यांनी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कार्य केले आहे. म्हणून यासाठी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी 11 एप्रिल रोजी अकोला शहरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत प्रत्येक समाजातील बंधू भगिनींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे मार्गदर्शक प्रकाश लक्ष्मणराव तायडे यांनी याप्रसंगी केले.




टिप्पण्या