Lok-Sabha-Election-2024-akl: विदर्भात काँग्रेसचे काय चाललंय ? अकोला लोकसभा मतदार संघातून डॉ. अभय पाटील रिंगणात!


         कारण - राज - कारण

               विश्लेषण 

     ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

                  अकोला 



सध्या देशात सर्वत्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. जन सामान्यांच्या गप्पांमध्ये सुध्दा राजकारण आणि आगामी लोकसभा निवडणूक यावरच चर्चा रंगताना दिसत आहे. अकोला लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी पक्ष पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात जिंकण्याच्या इराद्यानेच उतरलेली असल्याचं सध्या चित्र आहे. वंचितच्या वारंवार पत्रकार परिषद, पोस्टरबाजी, सभा यामुळे निवडणुकीचे वातावरण निर्माण होत आहे. तर एमआयएमचे राष्ट्रीय नेते असदूद्दिन ओवेसी आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची अकोल्यात जाहीर सभा पार पडली. तर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह  अकोल्यात येवून पदाधिकाऱ्यांना विजयाचा कानमंत्र देऊन गेले. ही बैठक अतिशय गोपनीय पार पडली. अश्या सर्व वातावरणात विदर्भात काँग्रेसचे काय चाललंय, असा प्रश्न सामान्यांना पडतो. परंतू आतील गोटातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे मित्रपक्ष असलेल्या खासदारांना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस खास रणनीती आखत असल्याचं आता समोर येतं आहे. काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विदर्भातील सर्व दहा लोकसभेच्या जागांवर दावा करणार आहे.  काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ज्या जागांवर भाजपचा जनसमर्थन कमकुवत होता किंवा इतर संघटनांच्या उमेदवारांनी भाजपच्या मदतीने निवडणूक जिंकली होती त्या जागांवर विशेष लक्ष केंद्रित केल्या जात आहे. तेथील बारीक सारीक माहिती गोळा केली जात आहे. एकीकडे भाजपने क्लस्टर सभांच्या माध्यमातून कमकुवत समजल्या जाणाऱ्या जागांसाठी निवडणुकीच्या कामाचे नियोजन सुरू केले आहे.  या जागांसाठी केंद्रीय मंत्री यांच्या व्यतिरिक्त स्थानिक ज्येष्ठ नेत्यांची विशेष मदत घेतली जात आहे. दरम्यान काँग्रेसही भाजपच्या समांतर रणनीती आखत आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा वंचित बहुजन आघाडी सोबत होण्यासाठी अद्याप मुहूर्त निघाला नाही. या दरम्यान अकोला लोकसभा मतदार संघात काँग्रेस कडून डॉ. अभय पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.





काँग्रेसने लोकसभा मतदारसंघ स्तरावर निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. निरीक्षकांसोबत समन्वयक सुद्धा आहेत. ज्येष्ठ नेते किंवा माजी मंत्र्याकडे निरीक्षकाची जबाबदारी देऊन लोकसभा मतदारसंघ पातळीवर काँग्रेसची निवडणूक रणनीती अवलंबिली जातं आहे.  

 


काँग्रेसच्या सूत्रानुसार, विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागांवर काँग्रेस दावा करणार आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गट आहेत.  अकोल्यासाठी वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर आघाडीसोबत येऊ शकतात. मात्र अद्याप जागा वाटपाची बोलणी निश्चित झाली नसल्याने तळ्यात की मळ्यात असा खेळ सुरू आहे. मात्र ॲड. आंबेडकर यांनी याआधी अनेकदा निवडणूक स्वबळावर लढणार असे वक्तव्य केलेले आहे. त्यामुळे वंचित युतीत सामील झाले नाही तरी निवडणुक लढण्याची संपुर्ण ताकद ठेवून आहेत.



2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातून लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या.  सध्या शिवसेनेच्या तीनही खासदारांनी बाजू बदलून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. विदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीला जनाधार नाही, असे काँग्रेस नेत्यांना वाटते. नेत्यांच्या मते विदर्भात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. सर्व लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांचे सर्वेक्षण केले जात आहे. विजयाची सर्वाधिक शक्यता असलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल. त्यातही उच्चशिक्षित, समाजात प्रतिष्ठित अश्या नव्या चेहऱ्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. अकोला बाबत विचार केल्यास डॉ. अभय पाटील यांचे नावं चर्चेत अग्रेसर आहे. डॉ. अभय पाटील अर्थोपेडिक सर्जन असून, काँग्रेस विचारसरणी अवलंबणारे आहेत. 



महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस हे पद भूषवित आहेत. लोकसभा निवडणुक 2024 लक्षात घेता कुठलाही गाजावाजा न करता, जाहिरातबाजी न करता पक्ष मजबुती साठी डॉ. अभय पाटील अकोला लोकसभा मतदार संघ पिंजून काढत आहे. सर्व स्तरातील लोकांशी संवाद साधत आहेत. 


आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जनजागृती ,जिल्हामध्ये काँग्रेस पक्षाची बांधणी करून बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील अडचणी समजून घेण्यासाठी वैयक्तिक भेटी, कॉर्नर मिटिंग,सामूहिक सभा,भेटी डॉ. अभय पाटील घेत आहेत. त्यांच्या सोबत महाविकास आघाडीतील पक्षाचे जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित असतात. अश्या या सर्व वातावरणात डॉ. अभय पाटील यांना काँग्रेस अकोला लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देणार असल्याचं बोलल्या जात आहे.




मात्र, महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाची चर्चा नाही. परंतू काँग्रेस पक्षाची आगामी निवडणूक संदर्भात लोकांशी भेटीगाठी सुरू आहेत. येत्या काही दिवसातच लोकसभा मतदारसंघ पातळीवर काँग्रेसची निवडणूक तयारी दिसून येईल, असे काँगेस मधील एकंदरीत वातावरणातून दिसत आहे.




एकीकडे वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी सोबतची बोलणी सुरू आहे, मात्र ही बोलणी फिस्कटल्यास अकोल्यात भाजप , वंचित आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार हे निश्चित.






टिप्पण्या