good-friday-2024-akola-city: अकोला शहरात गुड फ्रायडे साजरा: प्रभू येशू यांना सुळावर चढविण्याच्या सजीव देखाव्याने उपस्थितांचे डोळे पाणावले





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : ‘गुड फ्रायडे’ हा दिवस प्रभू येशू यांनी मानवतेच्या हितासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ जगभर साजरा केला जातो. प्रभू येशू यांना सुळावर चढविले तो दिवस म्हणजे ‘गुड फ्रायडे’.आज शुक्रवार 29 मार्च रोजी अकोला शहरातील माऊंट कारमेल चर्चमध्ये गुड फ्रायडे निम्मित नाट्य रुपात प्रभु येशू यांचा जीवन महिमा दाखविण्यात आला. हा सजीव देखावा पाहण्यासाठी चर्च परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.




प्रभू येशू यांनी जगाला क्षमा, शांती, दया, करुणा, परोपकार, अहिंसा,  आणि पवित्र आचरणाची शिकवण दिली. आपला अतोनात छळ करणाऱ्यांनाही परमपिता ईश्वराने क्षमा करावी, अशी याचना अंत्यक्षणी प्रभू येशू परमपिता परमेश्वराकडे करतात. म्हणूनच ख्रिस्त बांधव यादिवशी प्रभू येशूकडे आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या चुकांबद्दल क्षमायाचना करतात. यासंदर्भात अशीही एक आख्यायिका आहे की, प्रभू येशू यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी ते पुन्हा जिवंत झाले होते आणि आपल्या अनुयायांना भेटले होते. ते ज्या दिवशी पुनर्जीवित झाले, त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे हा दिवस ‘ईस्टर संडे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. 





आज सकाळी माऊंट कारमेल चर्च परिसरात प्रभू येशू ख्रिस्तांना सुळावर चढविण्याच्या घटनेचा सजीव देखावा सादर करण्यात आला. यावेळी ज्याप्रमाणे येशू ख्रिस्त 14 टप्प्यातून यातना सहन करून गेले, असे 14 टप्पे तयार करण्यात आले होते. दहाव्या टप्प्यात येशू ख्रितांना सुळावर चढवण्यात आलं. अनेक यातना सहन करूनही परमपिता परमेश्वराला येशू प्रार्थना करतात की, “हे ईश्वर यांना माफ कर, यांना माहित नाही हे लोक काय करत आहेत.” 14 व्या टप्प्यात येशू यांच्या पार्थिवाला एका गुफेत ठेवण्यात आले, असा संपूर्ण घटनाक्रम या सजीव देखव्यातून दाखविण्यात आला. हा देखावा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तर अनेकांनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.






यानंतर चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना  करण्यात आली. यावेळी जगात शांती आणि प्रेमाचा संदेश फादर डॉ.जोस्लीन यांच्याद्वारे देण्यात आला.







टिप्पण्या