consumer-forum-order-laptop : ग्राहकास नवीन लॅपटॉप देण्याचा ग्राहक मंचचा आदेश

            ॲड. इल्यास शेखानी 





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: एका वर्षाच्या वॉरंटी पिरियडमध्ये असताना दुकानातून नवीन घेतलेला लॅपटॉप अवघ्या सात  महिन्यातच बंद पडला. वॉरंटी पिरियड मध्ये असलेला नवीन लॅपटॉप दुकानदाराने बदलून अथवा दुरुस्त करून दिला नसल्यामुळे ग्राहकाने ग्राहक मंच मध्ये केलेल्या तक्रारीत ग्राहक मंचने प्रस्तुत दुकानदारास क्षतीपूर्तीसह नवीन लॅपटॉप देण्याचा आदेश बजावला आहे. 






एसटी कॉलनी परिसरातील रहिवासी रजनी नंदलाल सावळे व त्यांचे पती नंदलाल सावळे यांनी रणपिसे नगर येथील सिग्मा कॅम्पुटर मधून अशर कंपनीचा नवीन लॅपटॉप खरेदी केला होता. सदर लॅपटॉप मध्ये कोणताही निर्मिती दोष असल्यास तो निशुल्क व आवश्यकतेनुसार पार्ट बदलून, दुरुस्त करून दिल्या जाईल, असे एक वर्षाच्या वॉरंटी पिरियड मध्ये नमूद करण्यात आले होते. 




खरेदी केल्याच्या सात महिन्यात प्रस्तुत लॅपटॉप बंद पडला. नंदलाल सावळे यांनी या संदर्भात दुकानदारास माहिती दिली. मात्र दुकानदाराने लॅपटॉप वॉरंटीत असूनही दीड महिना चालढकल केली. यानंतर पुन्हा प्रस्तुत दुकानदारास लॅपटॉप संदर्भात विचारणा केली असता प्रस्तुत लॅपटॉप हा वॉरंटी पिरियडमध्ये नसल्याचे सांगितले. 



सावळे यांनी हा लॅपटॉप वारंटीत असल्याची बाब निदर्शनास आणल्यावर दुकानदाराच्या टेक्निशियनने हा लॅपटॉप दुरुस्त केला. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅपटॉप बंद पडला. सावळे यांनी या संदर्भात पुन्हा आपली तक्रार नोंदवली. दुकानदाराच्या टेक्निशियनने पुन्हा सावळे यांचा लॅपटॉप आपल्याकडे घेऊन एक महिना वेळ देऊनही सावळे यांचा लॅपटॉप दुरुस्त होऊ शकला नाही. अखेर एक महिन्याने टेक्निशियन हा लॅपटॉप दुरुस्त केला. मात्र तो पुन्हा बंद पडला. 



लॅपटॉपची वारंवार दुरुस्ती करूनही तो नादुरुस्त होत असल्याने लॅपटॉप मध्ये उत्पादकीय दोष असल्याचे सावळे यांच्या निदर्शनास आले. सबब सावळे यांनी दुकानदार व अशर कंपनीविरुद्ध ग्राहक मंचात क्षतीपूर्तीची तक्रार दाखल केली. ग्राहक मंचाने कंपनी, दुकानदार व तक्रारदार सावळे यांचे म्हणणे ऐकून तक्रारदार सावळे यांनी घेतलेल्या लॅपटॉप ऐवजी नवीन लॅपटॉप एक वर्षाच्या वॉरंटी समवेत देऊन तक्रारदाराला शारीरिक मानसिक व आर्थिक वर्षापूर्वी 7 हजार रुपये व प्रकरण खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचे आदेश बजावलेत. 



ग्राहक मंचाचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, सदस्य सुहास आळशी, नीलिमा बेलोकार यांनी हा आदेश  बजावला. तक्रारदार सावळे यांच्या बाजूने ॲड. इल्यास शेखानी यांनी तर अशर कंपनीतर्फे ॲड. प्रवीण राठी तथा सिग्मा कॉम्प्युटर तर्फे ॲड. अलकर यांनी कामकाज बघितले.

टिप्पण्या