akola-lok-sabha-constituency: अकोला लोकसभा मतदार संघ:काँग्रेस पाठोपाठ शिवसेनाने (उबाठा) सुरू केली मैदानात उतरण्याची तयारी; तातडीच्या बैठकीत नेमकं ठरलंय काय?




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 



अकोला : अकोला लोकसभा मतदार संघसाठी भाजपाने युवा नेते अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे लोकसभेचे उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. मात्र महाविकास आघाडी सोबत वंचितची जागा वाटपाबाबत अद्यापही बोलणी झालेली नसल्याने काँग्रेसच्या वतीने डॉ.अभय पाटील यांनी मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. तर  गुरुवार 14 मार्च रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात तातडीची बैठक घेवून पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी दर्शविली आहे.




गुरुवारी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पक्ष कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिकीट मिळाल्यास जोमाने काम करू तर स्वतंत्रपणे लढण्याची वेळ आली तर आपला उमेदवार कशा प्रकारे विजय होईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. 



एकीकडे ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अकोला लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा आधीच केलेली आहे. तर गुरुवारी शिवसेना उद्धव ठाकरे गट सुद्धा अकोल्याची जागा मागणार असल्याचं दिसून आले आहे. एकूणच आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याने वंचित आणि महाविकास आघाडीची आघाडी नेमकी होणार की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.




येत्या दोन तीन दिवसात निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. निवडणुक तोंडावर आली असताना, निवडणूकीच्या तयारीला वेग आला आहे. अकोला लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास येथे वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा उमेदवाराची निश्चिती झाली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचं महाविकास आघाडीतील समावेश होण्याचं भिजत घोंगडे आहे. त्यामुळे भारतीय काँग्रेस आणि शिवसेना उबाठा तसेच राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटातील इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे.




अकोला लोकसभा मतदार संघ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. भाजप, काँग्रेस आणि वंचित आघाडीतील तिरंगी लढतीत भाजपला सहज विजय मिळाला असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र आता महाविकास आघाडी सोबतचे जागा वाटपाचं गणित बिघडलं आणि स्वतंत्र लढण्याचं ठरविले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सामना देखील या तीन पक्षाच्या उमेदवारांना करावा लागणार. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचे चित्र यंदा कदाचित बदललेलं दिसू शकते.

 




 






टिप्पण्या