shivsena-agitation-akola-mnc: स्वाती कंपनी विरोधात शिवसेनेचा (उबाठा) मनपा उपायुक्त कक्षात ठिय्या ; खुर्चीची केली तोडफोड




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला मनपा क्षेत्रातील नागरिकांकडून कर वसुलीचा ठेका गैर पद्धतीने स्वाती कंपनीला दिला आहे. ही कंपनी शहरातील रहिवाशी नागरिकांना घर जप्तीची धमकी देत असून कंपनीला  मनपा कडून अभय मिळत असल्याचा आरोप करीत कंपनी आणि मनपाची ही अरेरावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही, हे सांगण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांकडून कर वसुली करायची असेल तर  स्वाती कंपनीला दिले जाणारे कमिशन नागरिकांना शास्ती माफ करून मनपाने स्वतः कर वसुली करावी, या मागणीसाठी आज मनपा उपायुक्त यांच्या कक्षात शिवसेना उबाठा गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या सोबतच जल प्रदाय आणि कर विभाग कार्यालयाला टाळा ठोकून विभागाचे अधिकारी केवळ खुर्च्या झीजवत आहेत, त्याचा निषेध म्हणून यावेळी शिवसैनिकांनी त्या कक्षतून खुर्ची बाहेर आणून खुर्चीची तोडफोड केली.




मनपाने  प्रशासकपदाच्याअधिकाराचा  गैरफायदा घेत कर वसुलीचा ठेका स्वाती कंपनीला देवून मनमानी पद्धतीने कमिशन दिले. यामुळे अकोला महानगर पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय मनपा कर्मचाऱ्यांना कामच उरले नाही. अश्याही स्थितीत स्वाती कंपनी मनपा कर्मचाऱ्यांचा वापर करून कर वसुलीसाठी नागरिकांना धमक्या देत आहेत. अश्या धमक्या देणाऱ्या स्वाती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनपा कडून अभय मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे स्वाती कंपनी आणि या कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्त यांच्या निषेधार्थ मनपा उपायुक्त यांच्या कक्षात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांचे नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 




याचवेळी जल प्रदाय विभागाचे अधिकारी नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेकडे दुर्लक्ष करतात,असा आरोप करीत अधिकाऱ्यांची कक्षातील खुर्चीबाहेर आणून ती तोडण्यात आली.  तसेच कर विभागाचे कार्यालयालाही टाळा ठोकला. 





राजेश मिश्रा यांच्यासह गजानन बोराळे, तरुण बगेरे ,अनिल परचुरे, सुरेंद्र विसपुते, चेतन मारवाल, सुनील दुर्गिया आदींसह शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.



टिप्पण्या