please-save-my-valentine-akl: प्लीज सेव माय व्हॅलेंटाईन! गुलाबाचे फुल व भविष्याचे ग्रीटिंग कार्ड देत अनोखा व्हॅलेंटाइन डे




ठळक मुद्दा 

अकोला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून युवक झाले एकत्रित 



जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: 14 फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ ला  अकोल्यातील युवकांनी ‘माझे पहिले प्रेम माझा जिल्हा’ म्हणत अकोला जिल्ह्याच्या भविष्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी अकोला शहरातील गांधी जवाहर बाग येथे युथ मीट घेण्यात आली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी युवा पिढी एकवटली होती. ‘सेव्ह माय व्हॅलेंटाईन’ चा नारा देत युवकांनी नागरीकांना , लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला अकोल्याच्या भविष्याचे ग्रीटिंग कार्ड दिले.




आज अकोला जिल्ह्यातील युवकांनी  पुढाकार घेऊन अकोला जिल्हा कसा असावा, यासाठी शेतकऱ्यांचा, कामगारांचा, कलाकारांचा, बेरोजगारांचा, MPSC UPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचा, सर्व विद्यार्थ्यांचा, बंद होणाऱ्या शाळांचा शिष्यवृत्तीचा बस सुविधेचा, महाग होणाऱ्या शिक्षणाचा, महिलांच्या असुरक्षिततेचा, शिक्षक प्राध्यापक पोलीस नोकर भरतीचा, शासकीय वसतीगृह आणि अभ्यासिकांचा, अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या पगाराचा, आरोग्य व्यवस्थेचा, स्वच्छता आणि महिला प्रसाधन गृहाचा तसेच सर्व सोयीसुविधांचा सामान्य जनतेच्या हक्कांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून "अकोल्याचा युवा जाहीरनामा" तयार करण्यासाठीची प्रक्रियेला युवापिढी पुढाकार घेत सुरूवात केली. 





सकाळी दहा वाजता अकोला जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून युवक युवती आणि अकोलेकर गांधी जवाहर बाग येथे जमले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना अर्पण करण्यात आली. उपक्रमाच्या प्रास्ताविकेतून युवा जाहीरनाम्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. 


उपस्थित युवा पाच गटामध्ये विभागून गटचर्चा करण्यात आली. त्यामधून विवीध क्षेत्रातील समस्या, अडचणी आणि प्रश्न समोर आले. त्यावरती साधक बाधक चर्चा करण्यात आली. आणि त्या माध्यमातून काही उपाययोजना सुद्धा युवकांनी सुचविल्या. उपक्रम स्थळी अकोला जिल्हा जाहीरनामासाठीच्या सूचनांसाठी सूचनापेटी ठेवण्यात आली होती. जमलेल्या प्रत्येकाने आपल्या सूचना या सूचना पेटीमध्ये टाकल्या. ही सूचनापेटी गावागावात, शाळा महाविद्यालयांमध्ये घेऊन फिरणार असल्याचे सांगण्यात आले. त्या माध्यमातून ज्याही सूचना येतील, त्यावर आधारित अकोल्याचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. 



पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना अर्पण करून उपक्रम सुरू करण्यात आला पुढे हा उपक्रम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी फासावर जाऊन क्रांतीची मशाल पेटविली म्हणून 23 मार्च या दिवशी अकोल्याचा युवा जाहीरनामा पूर्ण तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 





हा जाहीरनामा अकोल्याचे भविष्य निर्धारित करणारा एक महत्त्वाचा दस्ताऐवज ठरणार असल्याचे मत युवकांनी व्यक्त केले. उपस्थित सर्व युवकांचे पाच गटांमध्ये विभाजन करण्यात आले. अकोल्यातील बस स्थानक, भाजी बाजार, कपडा मार्केट, अशोकवाटिका, चिवचिव बाजार, नागरीकांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परीषद यामधील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना ‘सेव माय व्हॅलेंटाईन’ म्हणत गुलाबाचे फुल आणि ग्रिटींग कार्ड देऊन आमचं प्रेम वाचवा, अशी हाक युवक-युवतींनी लोकप्रतिनिधी, प्रशासकिय अधिकारी यांना दिली. युवा संगम आयोजीत या उपक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

टिप्पण्या