akola-crime-news-pinjar-police: ग्राम टिटवा येथील युवकाच्या हत्येची उकल; जन्मदाता आणि मोठा भाऊच निघाला वैरी, आरोपींना 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आपल्या मुलाचे गावातील मुलीवर प्रेम संबंध जुळले असल्याचे समजताच जन्मदात्याने आणि सख्या मोठया भावानेच बदनामी पोटी निष्पाप युवकास यमसदनी धाडले. गावात समाजात आपली बदनामी होईल, या भीती पोटी अक्ष्यम्य कृत्य बाप लेका कडून घडले. नात्याला काळीमा फासणारी ही ऑनर किलिंग घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत घडली.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ०९  फेब्रुवारी २०२४ रोजी पो.स्टे. पिंजर येथे फिर्यादी  पवन विठ्ठलराव जाधव (वय ४६ वर्ष व्यवसाय  पोलीस पाटील रा. टिटवा ता. बार्शिटाकळी जि. अकोला) यांनी तक्रार दिली कि, गावातील नागोराव गांवडे यांचे राहत्या घराच्या खोली मध्ये त्यांचा लहान मुलगा संदीप गावंडे याचे हात पाय बांधुन ठेवलेले दिसत असुन तो मृत अवस्थेत आहे. अशा त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. ला अप. क. ५६/२०२४ कलम ३०२ भा.दं. वि. प्रमाणे गुन्हा नोंद केला. त्यास कोणी मारले याबाबत माहिती नसल्याने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून तपासात घेतला.  घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापुर  मनोहर दाभाडे  व स्थागुशा अकोलाचे  पो. नि. शंकर शेळके, व पो.उप.नि. गोपाल जाधव तसेच पो.स्टे. पिंजरचे ठाणेदार स.पो.नि. राहुल वाघ व पो.उपनि. बंडु मेश्राम यांनी भेट दिली. 



पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ जावुन पाहणी केली व मृतक याचे वडीलांना विचारपुस केली असता, त्यांनी सांगितले कि, मी ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी माझी पत्नीची अचानक तब्येत खराब झाल्याने मी व माझी पत्नी व माझा मोठा मुलगा व माझी सुन व माझी मुलगी असे सरकारी दवाखाना अकोला येथे ईलाजा करिता जात असतांना, यातील मयत हा घरीच होता व त्याचे सांगण्यावरून मी घराचे लोखंडी गेट बाहेरून कुलुप लावुन सकाळीच निघुन गेलो होतो. व रात्रभर दवाखान्या मध्ये मुक्कामी होतो. दिनांक ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी मी एकटा घरी येवुन लोखंडी गेटचे कुलुप उघडुन घराच्या आत जावुन पाहिले असता, घरातील एका खोलीत माझा लहान मुलगा संदीप याचे हात पाय तोंड बाधुन मृत अवस्थेत मिळुन आला. आरोपीने केलेला हा बनाव मात्र पुढे पोलिसांसमोर चौकशी दरम्यान फसला.



गुन्हयाच्या तपासात पोलीसांना मयत  संदीप नागोराव गावंडे (वय २४ वर्ष रा. टिटवा) याचे वडील व भाऊ यांच्यावर संशय आल्याने, पोलीसांनी त्यांची सखोल विचारपुस केली असता परिस्थीती जन्य पुराव्या वरून व साक्षीदारांचे जाब जबाबावरून असे निष्पन्न झाले कि, यातील मयत याचे गावातील एका मुलीसोबत प्रेम संबध होते. त्या प्रेम संबधामुळे आपली समाजात बदनामी होत आहे. अशी त्यांची धारणा झाल्याने यातील आरोपी  मयतचे वडील नामे नागोराव कडनाजी गावंडे (वय ६० वर्ष), मयतचा मोठा भाऊ  प्रदीप उर्फ सोनु नागोराव गावंडे (वय ३२ वर्ष) यांनी ०८ फेब्रुवारी २०२४ रोजी यातील मयत यास राहत्या घरात मारहाण केली व इलेक्ट्रीक वायरने व कापडी धुपटयाने हात पाय तोंड बांधुन त्याचा गळा ईलेक्ट्रीक केबलने आवळला. त्यामुळे तो मरण पावला. 



मृतक युवकाचे शवविच्छेदन केले असता, युवकाचा मृत्यु गळा आवळुन व डोक्याला गंभीर ईजा झाल्याने मरण पावला असल्याचे अभिप्राय वैद्यकिय अधिकारी यांनी दिले. यामुळे मृतकाच्या घरच्यांवर संशय बळावला. यानंतर प्राथमिक चौकशी नंतर पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्हीं आरोपींना १२ फेब्रुवारी २०२४ पर्यन्त पोलीस कस्टडी सुनावली. 



जिल्हा पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह ,  अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे  यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापुर  मनोहर दाभाडे  व स्थानिक गुन्हे शाखाचे  पो. नि शंकर शेळके, पो.स्टे. पिंजर ठाणेदार राहुल वाघ व पो.उपनि. गोपाल जाधव LCB अकोला, पो.उपनि. बंडु मेश्राम पो.स्टे. पिंजर व पोलीस अंमलदार नामदेव मोरे, चंद्रशेखर गोरे, भगवान मात्रे, पंकज एकाडे, व स्थागुशाचे पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, लिलाधर खंडारे चालक प्रशांत कमलाकर यांनी ही कारवाई केली.

टिप्पण्या