Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात पेट्रोल टँकर चालकांनी पुकारला बेमुदत बंद; पेट्रोल पंपावर लागल्या लांब रांगा, भाजी मार्केटमध्ये सुध्दा गर्दी





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला :  केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात पेट्रोल टँकर चालकांनी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका  वाहनधारकांना बसण्याची चिन्ह आहेत. अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या आहेत.




केंद्र सरकारच्या हीट अँड रन कायद्याविरोधात वाहतूकदारांनी व ट्रक मालवाहू वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदमध्ये पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकरचालक देखील सहभागी झाल्याने पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर तुफान गर्दी केल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझल तुटवड्याच्या धास्तीने लोकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे.





केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर  ट्रकचालक घटना स्थळ वरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचं वाहन चालकांचे म्हणणे आहे. यासाठी या कायद्याविरुद्ध टँकर व ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




केंद्र शासनाने वाहनचालकासाठी केलेल्या कायद्याला टँकर, ट्रक चालकांनी विरोध केला असून या सर्व टँकर चालकांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडेन गॅस या कंपनीच्या जवळपास 2000 पेक्षा जास्त टँकर चालकांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. यामुळे राज्यात इंधन तुटवडा होण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. केंद्र सरकारने हा कायदा करू नये. अन्यथा, याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.




या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे. संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सोमवारी अकोला जिल्ह्यातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर नागरिकांनी वाहनात पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. 




भाजी बाजारावर परिणाम 


पेट्रोल पंप येथे येणाऱ्या टँकर चालकांचे संपामुळे पेट्रोल पंपावर लोकांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी प्रचंड प्रमाणात दुपारी गर्दी केली. यामुळे आता वाहतुकीवर परिमाण होईल, याची शक्यता नाकारता येणार नाही,असे भाकीत करुन, अनेक लोकांनी भाजी खरेदीसाठी भाजी बाजाराकडे धाव घेतली. अचानक भाज्यांची  मागणी वाढल्यामुळे भाजी मार्केटमध्ये फळ व पाले भाज्यांसह इतर वस्तूंचे सुद्धा अचानकपणे भाव वाढल्याचे चित्र अकोल्यात सोमवारी सायंकाळ नंतर निर्माण झाले आहे.












टिप्पण्या