bhavana-gawali-income-tax notice: खासदार भावना गवळी यांच्या प्रतिनिधींनी अकोला आयकर विभागात लावली हजेरी; संस्थेत 19 कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शिवसेना शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या नावे आयकर विभागाने नोटीस बजावली होती. भावना गवळी यांना आज अकोला येथील आयकर विभागात स्पष्टीकरण देण्यासाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. या अनुषंगाने भावना गवळी यांना 26 कोटी रुपयाच्या रोख रकमेचा हिशोब मागविण्यात आला होता. 



आज अकोला येथील आयकर विभागाच्या कार्यालयात यासंदर्भात भावना गवळी यांच्या प्रतिनिधींनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आपल्या स्पष्टीकरणात त्यांनी काय म्हंटल आहे, याचा खुलासा झालेला नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या व्यक्तींनी प्रसार माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले.






यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नोटीस पाठवली आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत 19 कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचे आयटीच्या नोटिसीत म्हटले आहे. त्यांना शुक्रवार, 5 जानेवारीपर्यंत नोटिसीला उत्तर द्यावे लागणार असे नोटीस मध्ये म्हंटले आहे.त्यानुसार आज त्यांचे प्रतिनिधी अकोला आयकर विभाग कार्यालयात हजर झाले होते.




शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघाच्या लोकसभा खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेत 19 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे, असा ठपका ठेवत याप्रकरणी आयकर कायद्याच्या कलम 131 (1A) कलमानुसार 29 डिसेंबरला नोटीस बजावली आहे. याआधी 2022 मध्ये ईडीने संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांना तीन नोटिसा पाठवल्या होत्या.


याआधी देगावात ईडीची कारवाई
    file photo 


ईडीने वाशीमच्या रिसोडमधील देगावमध्ये कारवाई करत गवळी यांच्या ट्रस्टचे संचालक सईद खान यांना अटक केली होती. ट्रस्टला बेकायदेशीररीत्या कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात देखील गैरव्यवहार झाला. यात सर्व प्रकरणात 19 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. दरम्यान, या घोटाळय़ाबरोबर 7 कोटी रुपयांच्या रोख रकमेचादेखील गैरवापर झाल्याचा ठपका ईडीने भावना गवळी यांच्यावर ठेवला होता.


 


ईडीच्या नोटिसीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न करत त्यांनी गवळी यांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्या विरोधातच गुन्हा नोंदवला होता. मात्र, तीन वेळा नोटीस बजावूनही गवळी ईडीसमोर चौकशीसाठी आल्या नाहीत.


महिला आणि तरुणींना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने भावना गवळी यांनी 27 नोव्हेंबर 1998 ला प्रतिष्ठानची सुरुवात केली. त्या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत.


प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयुर्वेद महाविद्यालय चालविण्यात येते. वाशीम जिह्यातील रिसोड येथे हे आयुर्वेद महाविद्यालय आहे. याशिवाय देगाव येथे फार्मसी संस्था, पब्लिक स्कूल, शिरपूरमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, सीनिअर कॉलेज, प्राथमिक शाळा, निवासी शाळा, वाशिम आणि यवतमाळ जनशिक्षण संस्था चालविण्यात येतात, असे समजते.


टिप्पण्या