akola-nagpur-jal-sangharsh- yatra-water-issue: पाणीप्रश्नावर 'अकोला ते नागपूर' जल संघर्ष यात्रा: आमदार नितिन देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल, चौकशी कामी हजर राहण्याची सूचना




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बाळापूरचे आमदार नितिन देशमुख यांनी खारपाण पट्ट्यातील पाणी प्रश्नाकरीता एप्रिल २०२३ मध्ये अकोला ते नागपुर जल संघर्ष यात्रा  आंदोलन केले होते. याप्रकरणात आमदार देशमुख यांच्यावर नागपूर येथे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी आता चौकशी, तपास कामी आमदार देशमुख यांना बोलवण्यात आले असून, त्याबाबतची सूचना (समन्स) संबंधित पोलिस स्टेशनने आमदार देशमुख यांना पाठविली आहे.



फौजदारी प्रकीया संहिता १९७३ कलम ४९ (अ) (१) अन्वये नितीन देशमुख  यांना ही सूचना पाठविली असून गुन्ह्याच्या तपासकामी हजर राहावे,असे सूचित केले आहे. हिंगणा पोलीस स्टेशन नागपुर शहर येथे गुन्हा नोंद असून कलम १४३, १८८ भादवि सहकलम ३७. १३५ म.पो.का. अन्वये  २२.०४.२३  रोजी गुन्हा दाखल आहे.


या गुन्ह्याच्या चौकशी, तपास कामी  १८.०१.२०२४  पूर्वी हिंगणा पोलीस ठाणे, नागपुर शहर  ठीकाणी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या दस्तऐवजासह हजर रहावे. नमुद वेळी आपण चौकशी कामी हजर न राहिल्यास आपणास काही एक सांगायचे नाही, असे समजून आपणा विरोधात पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी, असे यामध्ये म्हंटले आहे. दत्तात्रय वाघ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हिंगणा नागपूर शहर यांच्या स्वाक्षरीने हे सूचना पत्र आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूर पोलिसांनी कारवाई केली होती. आमदार देशमुख यांनी १० एप्रिल रोजी पाणीप्रश्नावर 'अकोला ते नागपूर' जल संघर्ष यात्रा काढली होती. मात्र, नागपूर पोलिसांनी आमदार देशमुख यांना नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच ताब्यात घेतले होते. आमदार देखमुख हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या नागपूर येथील निवासस्थानी खारपाण पट्ट्यातील क्षारयुक्त पाणी टँकरने घेऊन जात असताना त्यांच्यावर धामणा परिसरात कारवाई केली होती.


अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघामधील एकूण ६९ गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. सरकारने ही स्थगिती उठवावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे. सरकारच्या निषेधार्थ आमदार देशमुख यांनी आपल्या समर्थकांसोबत अकोला ते नागपूर जल यात्रा काढली होती.




अकोला शहरातील राज राजेश्वर मंदिर ते देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान नागपूर असा या जल संघर्ष यात्रेचा मार्ग होता. खारपाण पट्ट्यातील खारं पाण्याचं टँकर घेऊन आमदार देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी दाखल होणार होते. उपमुख्यमंत्र्यांना खाऱ्या पाण्यानं आंघोळ घालणार होते. मात्र, त्याआधीच नागपूर पोलिसांनी आमदार देशमुख यांच्या नेतृत्त्वातील जल संघर्ष यात्रेला रोखले आणि सर्वांना ताब्यात घेतले होते. धामणा येथील दत्तवाडी परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 





टिप्पण्या