67th-national-school-boxing: यश प्राप्तीसाठी सर्वप्रथम ध्येय निश्चीत करा - जी. एस. संधू यांचे खेळाडूंना मौलिक मार्गदर्शन; 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेला अकोल्यात प्रारंभ




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : यश प्राप्तीसाठी खेळाडूंनी सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करावे आणि नंतर ते साध्य करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. असा मौलिक सल्ला भारत सरकारच्या द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित व भारतीय बॉक्सिंग संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक जी. एस. संधू यांनी दिला.



संगीतकार वसंत देसाई स्टेडियम येथे रविवारी आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय (14,17,19 वर्ष आतील मुले) बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 





आमदार वसंत खंडेलवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उद्घाटन समारंभात जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव, कविता मिटकरी, आशियाई पदक विजेते व बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र रिव्ह्यू कमिटी अध्यक्ष धर्मेंद्रप्रकाश भट्ट ,आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चोपडे, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, क्रीडा उपसंचालक विजय संतान, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, रामप्रकाश मिश्रा, विजय मालोकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शत्रुघ्न बिरकर, स्पर्धा निरीक्षक हिमांशू शुक्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट, शरद अग्रवाल, प्रभोजीत सिंह बछेर आदी व्यासपीठावर विराजमान होते.




श्री संधू पुढे म्हणाले की, माणसाचा सर्वांगीण विकास त्याच्या निरोगी शरीरावर अवलंबून असतो. कोणत्याही स्पर्धेतील विजय-पराजय यावर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात खेळला जाणारा खेळ अधिक चांगला करता येईल. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडू ही महाराष्ट्राची देणगी असल्याचे ते म्हणाले.




भारतीय बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र आणि रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष धर्मेंद्र प्रकाश भट्ट यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, आतापर्यंत पालकच मुलांना खेळापासून दूर ठेवत होते, पण आता मुलांव्यतिरिक्त त्यांचे पालकही दिसत आहेत. मैदानावर आणि त्यांच्या खेळाचे निरीक्षण करूया. खेळाडूंना आवाहन करताना ते म्हणाले की, खेळाडूंनी कधीही त्यांच्या खेळावर समाधानी राहू नये कारण जो समाधानी होतो त्याचा खेळ संपतो.






प्रास्ताविकात क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी निधीच्या कमतरतेवर प्रकाश टाकून किमान एक स्पर्धा आयोजित करण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये उपलब्ध असायला हवेत, असे सांगितले. 



कार्यक्रमाचे संचालन नीलेश गाडगे व जिनल सेठ यांनी केले. आभार  जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनी मानले. 



उद्घाटन सोहळ्याला खेळाडूंच्या पालकांव्यतिरिक्त शहरातील शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



पथसंचलनात राष्ट्रिय एकात्मताचे दर्शन 


प्रारंभी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवीत खेळाडू व स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. यावेळी अकोला पोलीस बँड पथकाने सुमधुर धून वाजविली. त्यानंतर खेळाडूंना स्पर्धेविषयी शपथ देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्यात आला नंतर हवेमध्ये रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध देशभक्ती गीतांवर नृत्य करून आपली कला सादर केली. मान्यवरांच्या भाषणानंतर क्रीडा स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. 14 वर्षातील गटातील पहिला उद्घाटनाचा सामना तामिळनाडूचा जयप्रभाकरण व महाराष्ट्राचा फैजान शेख यांच्यात लावण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ही लढत लावण्यात आली.


photo by 

Adv.Nilima Shingne -Jagad

टिप्पण्या