garbage-collection-freeservice: अकोला महापालिकेच्या कचरा घंटागाडी सेवा मोफत करा; अन्यथा ‘कचरा फेको’ आंदोलनाचा इशारा
ठळक मुद्दा
नगरसेवक विजय इंगळे यांचे आयुक्तांना सविस्तर निवेदन; कंत्राटातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : शहरातील कचरा संकलनासाठी सुरू असलेल्या घंटागाडी सेवेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे गटनेते तथा नगरसेवक विजय रामदास इंगळे यांनी अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तांना सविस्तर निवेदन देत कचरा संकलन सेवा तात्काळ पूर्णपणे मोफत करण्याची मागणी केली आहे. तसेच या सेवेसाठी दिलेल्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत संपूर्ण चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
इंगळे यांनी दिलेल्या निवेदनात शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून कचरा संकलनाच्या नावाखाली मनमानी वसुली सुरू असल्याचा आरोप करत प्रशासनावर तीव्र टीका केली आहे.
कचरा संकलन सेवा मोफत करण्याची मागणी
इंगळे यांनी म्हटले आहे की, अकोलेकर नागरिक आधीच मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर (Property Tax) भरत आहेत. त्यामुळे नागरी सुविधा पुरवणे हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे.
त्यांनी उदाहरण देत सांगितले की, अमरावती महानगरपालिकेत नागरिकांना कचरा संकलन सेवा मोफत दिली जाते, मग अकोल्यात नागरिकांकडून सक्तीची वसुली का केली जाते? त्यामुळे अकोल्यातही ही सेवा तात्काळ मोफत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या ‘मूकसंमती’चा सवाल
निवेदनात कचरा संकलनाचे दर ३० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले, तेव्हा शहरात प्रशासकीय राजवट होती. मात्र, दरवाढीच्या वेळी पदाधिकाऱ्यांनी याविरोधात आवाज का उठवला नाही, असा प्रश्न इंगळे यांनी उपस्थित केला आहे.
दरवाढ आणि कंत्राट प्रक्रियेत काही पदाधिकाऱ्यांची मूकसंमती होती का? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
व्यापाऱ्यांकडून मनमानी वसुलीचा आरोप
इंगळे यांच्या निवेदनानुसार शहरातील अनेक व्यापाऱ्यांकडून कचरा संकलनाच्या नावाखाली ५०० ते १००० रुपयेपर्यंत रक्कम वसूल केली जात आहे.
मात्र, प्रत्यक्षात त्यांना ५० किंवा २०० रुपयांचीच पावती दिली जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे उघडपणे चालणारा ‘पावती घोटाळा’ असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
अनेक भागात रोज कचरा उचलला जात नाही
कंत्राटाच्या अटींनुसार घंटागाडीने दररोज प्रत्येक गल्लीतील कचरा उचलणे बंधनकारक आहे.
परंतु प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत दोन-तीन दिवस गाडीच येत नाही, अशी तक्रार नागरिक करत आहेत. सेवा पूर्ण मिळत नसतानाही नागरिकांकडून पूर्ण पैसे वसूल करणे हा अन्याय असल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे.
कंत्राटदाराचा फायदा की प्रशासनाचा?
निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा मांडत इंगळे यांनी सांगितले की, महानगरपालिकेने स्वतःच्या कोट्यवधींच्या कचरा गाड्या कंत्राटदाराला दिल्या आहेत.
याशिवाय डिझेल आणि देखभालीचा खर्चही महापालिका करत आहे, आणि नागरिकांकडूनही पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे या व्यवस्थेमुळे कंत्राटदार आणि प्रशासनातील काही लोकांना फायदा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शिवसेनेच्या प्रमुख मागण्या
शिवसेना (उबाठा) गटाने निवेदनाद्वारे काही ठोस मागण्या केल्या आहेत :
शहरातील कचरा घंटागाडी सेवा तात्काळ मोफत करावी
व्यापाऱ्यांकडून होत असलेली मनमानी वसुली थांबवावी
आतापर्यंत झालेल्या वसुलीची संपूर्ण चौकशी करावी
दररोज कचरा न उचलणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी
नवीन खर्चिक प्रणाली का सुरू केली, याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी
‘कचरा फेको’ आंदोलनाचा इशारा
महापालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर शिवसेना (उबाठा) शहरात महापालिकेवर ‘कचरा फेको’ आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशाराही इंगळे यांनी दिला आहे.
अकोलेकरांच्या खिशातून कंत्राटदाराचे खिसे भरण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा