manoj-jarange-maratha - reservation: मनोज जरांगे पाटील 5 डिसेंबरला अकोल्यात; 300 एकर जागेवर चरणगाव येथे होणार जाहीर सभा

  File photo 


भारतीय अलंकार न्यूज 24

आलेगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करून सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ दिल्यानंतर राज्यभरात दौरा प्रारंभ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून येत्या 5 डिसेंबर रोजी ते अकोला जिल्ह्यात येणार आहेत.

        

मनोज जरांगे पाटील यांचा 'समाज बांधव गाठी-भेटी दौरा' सध्या तीन टप्प्यांमध्ये पार पडत आहे. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील 1 डिसेंबर रोजी जालना आणि अंबड येथे उपस्थित राहणार असून 2 डिसेंबर रोजी लाडसावंगी, कोलते पिंपळगाव, कन्नड, 3 डिसेंबर रोजी धुळे, जालना, 4 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव येथे समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन सायंकाळी शेगाव येथे मुक्काम करतील. 




त्यानंतर 5 डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्याच्या पातुर तालुक्यातील चरणगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. याच दिवशी वाशिम आणि हिंगोली येथेही त्यांची उपस्थिती राहील. 6 डिसेंबर रोजी हिंगोली, पुसद, महागाव, माहूरगड, 7 डिसेंबर रोजी उमरखेड, वारंगा फाटा, नांदेड, 8 डिसेंबर रोजी जिजाऊ नगर, भारतळा, नरसी, कंधार, 9 डिसेंबर रोजी जांब जळकोट, उद्गीर, निलंगा, 10 डिसेंबर रोजी औसा, टेंभी, किसकारी, कौठा, उमरगा, 11 डिसेंबर रोजी लोहारा, मुरुड, आंबेजोगाई, 12 डिसेंबर रोजी बोरी सावरगाव, धारूर, माऊली फाटा मार्गे अंतरवाली सराटी येथे दौऱ्याचा समारोप होईल, अशी माहिती प्रदीप साळुंखे  दौरा आयोजन समिती प्रमुख यांनी दिली




सभेची तयारी जोरात 


अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यातील चरणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेची तयारी जोरात सुरू आहे. 300 एकर जागेवर ही सभा होणार असून या सभेसाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या वाहनांसाठी दीडशे एकराच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेच्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज कडून प्रयत्न सुरू आहेत.

टिप्पण्या