murder-case-akola-city-crime: पूर्व वैमनस्यातून सोनटक्के प्लॉट मधील युवकाची हत्या; दोन आरोपी जेरबंद




भारतीय अलंकार 24

अकोला: जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत हिंगणा फाट्याजवळ पूर्व वैमनस्यातून युवकाची हत्या झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली आहे. या प्रकरणात जुने शहर पोलिस स्टेशनला हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, काही तासाच्या अवधीत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले.



मृतक शेख फारुख ऊर्फ शेख शाहरुख शेख हुसेन (वय 28 रा. सोनटक्के प्लॉट जुने शहर) याचे परीचितासोबत किरकोळ कारणावरून हिंगणा फाटा जवळ शाब्दिक वाद झाले. हा वाद वाढून हाणामारीवर पोहचला. एवढ्यावरच हे प्रकरण संपले नाही. यामधून मारेकऱ्यांच्या हातून हत्येसारखा गंभीर गुन्हा घडला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस घटनास्थळी पोहचले.



पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. याप्रकरणी जुने शहर पोलिस स्टेशनला मारेकऱ्यांविरोधात भादंवि कलम 302, 34 नुसार गुन्हे दाखल केले. 


जुने शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून  लगेच तपास चक्र फिरवून काही तासाच्या अवधीत दोन आरोपींना ताब्यात घेतले. अतुल ऊर्फ जाकी श्रीकृष्ण अहिर (वय 28, रा. नवीन हिंगणा), अभिजीत सुनील वानखेडे (वय 25, रा. कळंबेश्वर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. 



ही कारवाई  पोलीस अधिक्षक संदीप घुगे , अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे ,उपविभागीय पोलीस अधिकारी दुधगावकर यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरिक्षक नितीन लेव्हरकर, रविंद्र लांडे,  प्रदिप घटे, रविंद्र करणकार, संतोष मेंढे,  शैलेष पाचपोर, छोटु पवार, सागर शिरसाट, पंकज सुर्यवंशी, पवन डांबलकर, शाम पोधाडे, अर्जुन खंडारे, रवी पालीवाल आदींनी केली.



दरम्यान मृतक शेख फारूख व आरोपी अतुल ऊर्फ जाकी श्रीकृष्ण अहिर, अभिजीत सुनील वानखेडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे समोर आले. मृतक आणि आरोपी विरोधात गंभीर स्वरूपासह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 


टिप्पण्या