Shivni Airport: शिवणी विमानतळ संदर्भात आमदार वसंत खंडेलवाल यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट




ठळक मुद्दे

*आढावा बैठकीत विषय ठेवण्याचे अजित पवार यांनी दिले आश्वासन

*अन्य विकासाच्या विषयांवरही केली चर्चा



भारतीय अलंकार 24

मुंबई: अकोल्यातील शिवनी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचा ध्यास घेतलेल्या आमदार वसंतजी खंडेलवाल यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजित पवार यांची भेट घेऊन विमानतळासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ना.अजित पवार यांनी आमदार खंडेलवाल यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय लवकरच आढावा बैठकीत घेण्याचे आश्वासन दिले.

         



सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. आमदारकीची शपथ घेतल्यापासून आमदार खंडेलवाल यांनी अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यातील अनेक विकासाचे विषय मार्गी लावले. पश्चिम विदर्भातील सर्वांनाच लाभदायक ठरणारा अकोल्यातील शिवनी विमानतळाचा विषय गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. या विमानतळाच्या विस्तारित धावपट्टीसाठी आमदार खंडेलवाल यांनी आजपर्यंत दिल्ली- मुंबईत स्थानिक अधिकाऱ्यांना घेऊन अनेक बैठका घेतल्या. शुक्रवारी सकाळी 7 वाजता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजित पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विमानतळासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि हा विषय मार्गी लावण्यासाठी निवेदन देऊन चर्चा केली. अजित पवार यांनी या मागणीला उचलुन धरत हा विषय आढावा बैठकीत घेण्यासाठी आश्वस्त केले.

         

आपल्या मतदार संघातील अन्य काही विकासाच्या प्रकल्पांवरही आमदार खंडेलवाल यांनी ना. अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. खंडेलवाल यांनी मांडलेले सर्व मुद्दे शांतपणे ऐकून घेत हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले. भाजपचे प्रतुल हातवळणे यावेळी आ. खंडेलवाल यांच्यासोबत उपस्थित होते.

टिप्पण्या