Coal scam case: कोळसा घोटाळा प्रकरण: दर्डा पिता-पुत्राला चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

file photo 



भारतीय अलंकार 24

नवी दिल्ली: दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायलयाने छत्तीसगड मधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात आज बुधवारी माजी खासदार विजय दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 



विजय दर्डा यांच्यासह त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगड मधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात न्यायलयाने दोषी ठरवत चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक के.एस. क्रोफा आणि के.सी. सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.


न्यायालयाने विजय दर्डा आणि इतर आरोपींना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे. न्यायालयाने काही वेळापूर्वीच हा निर्णय दिला आहे.


सीबीआयने या प्रकरणात 27 मार्च 2013 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोप पत्रात सर्व आरोपींनी गैरमार्गाने कोळसा खाण आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात सीबीआयने 20 नोव्हेंबर 2014 रोजी क्लोजर रिपोर्ट सादर केला. मात्र तो स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आणि प्रकरणाचा तपास सुरु ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातल्या सर्वांना दिल्ली विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्यानंतर आज विजय दर्डा यांच्यासह इतर आरोपींना शिक्षा सुनावली आहे.





टिप्पण्या