pre-kharif-agricultural-fair-pkv: शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण कालसुसंगत - कुलगुरू डॉ. शरद गडाख

कृषी विद्यापीठामध्ये खरीप पूर्व कृषी मेळावा उत्साहात संपन्न




बियाणे खरेदीसाठी शेतकरी बांधवांचा उदंड प्रतिसाद


 



भारतीय अलंकार 24

अकोला: पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून आज व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना शेतकरी उत्पादक कंपन्याचे सक्षमीकरण काळाची गरज स्पष्ट प्रतिपादन  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. विस्तार शिक्षण संचालनालय द्वारे आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 




विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची  जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच  पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला आहे  अशा परिस्थितीमध्ये कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉ. गडाख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. तसेच एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट,  शेण, गोमूत्र, दुधासह शेतकामासाठी पशुधन आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन  देखील डॉ. गडाख यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सांगितले. 



याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य तथा आमदार  अमोल मिटकरी,  रणधीर सावरकर, विठ्ठल सरप पाटील,  हेमलता अंधारे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, शेतकरी प्रतिनिधी श्रीकृष्ण ठोंबरे, विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे , संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती तर अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, प्रगतिशील शेतकरी जामदार काका, नामदेवराव आढाऊ,  आप्पासाहेब गुंजकर, संपूर्ण  महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. 




अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञानाचा शेतीमधील प्रभावी वापर काळाची गरज- आ. रणधीर सावरकर 


याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा विधानसभेचे सदस्य आ.  रणधीर सावरकर यांनी आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाचा, तंत्रज्ञानाचा व पिक वाणांचा अवलंब करावा असे सांगतानाच गाव पातळीवर प्रक्रिया उद्योगाचे जाळे निर्माण करावे असे सांगतानाच  अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञानाचा समायोचित वापर करण्याचा सल्ला शेतकरी बांधवांना दिला. 




शेतजमिनीच्या संरक्षणासाठी अनुदानावर कुंपण योजना अत्यावश्यक - आ. अमोल मिटकरी 


विधान परिषदेचे सदस्य  आमदार अमोल मिटकरी यांनी कुलगुरू डॉ शरद गडाख आणि विद्यापीठाच्या सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन करताना काल सुसंगत संशोधनात घेतलेल्या आघाडीचे कौतुक केले व शेतकरी बांधवांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव व खरेदीची हमी मिळण्यासह वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीच्या बांधावर कुंपणाची योजना काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पारंपारिक पिकांना आधुनिकतेची जोड देत शेती व शेतकरी विकास करणे शक्य असल्याचे आश्वासक प्रतिपादन देखील आ. मिटकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. 



याप्रसंगी बोलताना महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांनी शेतकरी शेतकरी बांधवांना पेरण्याची घाई न करण्याचा अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला व पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासा व बीज प्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी करण्याचे आवाहन केले पट्टा पद्धतीचा वापर अधिक फलदायी असल्याचे सांगताना पद्धतीचा प्रभावी अवलंब करण्याचे आवाहन देखील श्री कलंत्री यांनी याप्रसंगी केले व महाबीजकडे सर्वच प्रकारच्या बियाणांची योग्य प्रमाणात उपलब्धता असल्याचे शेतकरी बांधवांना आश्वस्त केले. 



अमरावती विभागीय कृषी सहसंचालक  किसन मुळे यांनी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या योजनेचा फायदा निश्चितच मिळणार असल्याने महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. 


यावेळी आपल्या प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी बी उंदिरवाडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या  पिकांसंबंधीच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन निराकरण होत असल्याचे म्हटले. कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी शेतकऱ्यांकरिता ग्रामगीता असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रकाशनामध्ये  सर्व पिकांच्या लागवड तंत्राविषयीची अद्यायावत माहिती प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विविध पिकांवरील किडी व रोगांचे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे वेळीच शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. उंदीरवाडे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी तसेच सोयाबीन मूग उडीद तूर व मका पिकावरील किडी-रोगांच्या सम्बन्धी विस्तृत मार्गदर्शन करून येणाऱ्या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी एकत्रितपणे व्यवस्थापनत्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.




प्रगतिशील शेतकरी श्रीकृष्ण ठोंबरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाबीजचे बियाणे उत्कृष्ट प्रतीचे असल्याचे नमूद करून आपण स्वतः विद्यापीठ निर्मित बीज वाणांचा नियमित वापर करत असल्याचे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आमच्या करिता गुरुकिल्लीचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.  शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक शमवीण्याकरिता विद्यापीठाकडे आधुनिक कृषी तंत्राची भक्कम शिदोरी उपलब्ध असल्याचे नमूद करून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर पिकांना सेंद्रिय खत देणे हा एक उत्तम तोडगा असल्याचे म्हटले. यावेळी शेतीमध्ये ते प्रयोग करीत असलेल्या काही स्वनिर्मिती कृषी तंत्रांचा त्यांनी ऊहापोह केला.



तांत्रिक सत्र 


तांत्रिक सत्रामध्ये कृषी विद्यापीठातील डॉ करुणाकर यांनी 'हवामानाचा आढावा व या वर्षीच्या मान्सून चा अंदाज' याविषयी डॉ. अजय सदावर्ते  यांनी 'कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व रसशोषक किडींचे व्यवस्थापन' या विषयावर तर डॉ. श्याम मुंजे यांनी 'सोयाबीनचे लागवड तंत्र' या विषयांवर तांत्रिक सादरीकरण केले. डॉक्टर नवीन कायंदे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान तर डॉ. श्यामसुंदर माने यांनी खरीप पिकांमधील  रोगाचे नियंत्रण यावर सादरीकरण केले यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन शंकानिरसन केले. 



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजीव कुमार सलामे  यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार कृषी विद्यावेत्ता श्री प्रकाश घाटोळ यांनी केले. याप्रसंगी विद्यापीठातील सर्वाचं विभागांचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ विभागप्रमुख अधिकारी आणि विदर्भासह संपूर्ण राज्यातून आलेले शेतकरी बांधव सभागृहामध्ये उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आणि अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी शेतकरी बांधवांनी विद्यापीठ संशोधित नवीन पीक वाण बियाणे खरेदीसाठी  अभूतपूर्व प्रतिसाद देत विद्यापीठावरील आपला विश्वास अधोरेखित केला.



टिप्पण्या